अमळनेर (प्रतिनिधी)येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिराजवळ चोपडा रस्त्यावर अधिकृत बस थांबा मंजूर झाला आहे, मंगळग्रह सेवा संस्थेने यासाठी मागणी केली होती. येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात देशातून व परदेशातूनही असंख्य भाविक व पर्यटक नियमीतपणे येत असतात. त्यांना शहरातून येण्यासाठी व शहरात जाण्यासाठी तसेच चोपडा रस्ता मार्गावरील गावांना जाण्यासाठी बस थांब्याची नितांत आवश्यकता होती.
भाविकांची ही गरज लक्षात घेवून मंगळ ग्रह सेवा संस्थेने अमळनेर आगाराशी याबाबत पत्र व्यवहार केला होता. आगार प्रमुख श्रीमती अर्चना भदाणे यांनी या प्रस्तावास तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. चोपडा रस्त्यावरून श्री मंगळदेव ग्रह मंदिराकडे जाणा-या वळणाजवळ शहरात जाण्यासाठी व शहरातून येणाऱ्यांसाठी उतरण्याकरिता दोन बस थांबे अमळनेर आगाराने कार्यान्वित केले आहेत. यावेळी आगारप्रमुख श्रीमती भदाणे तसेच कामगार अधिकारी राहुल शिरसाठ, सांख्यिकी अधिकारी सुरेश महाजन, चालक किरण सोनवणे व बी.बी. बिहाडे तसेच मंगळ ग्रह सेवा संस्थेचे खजिनदार गिरीश कुलकर्णी व सहसचिव दिलीप बहिरम उपस्थित होते.