मुंबई प्रतिनिधी | राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार असून याबाबत आज सभागृहात घोषणा करण्यात आली.
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होत असते. दोन वर्षांपासून कोरोनामुळे मात्र हिवाळी अधिवेशन हे मुंबईतच घेण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका देखील केली होती. या पार्श्वभूमिवर, राज्य विधीमंडळाचे आगामी अर्थात अर्थसंकल्पीय अधिवेशन हे २८ फेब्रुवारीपासून नागपूर येथे घेण्यात येणार असल्याची घोषणा आज करण्यात आली.
आज विधीमंडळ कामकाज समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत पुढील अधिवेशनावर चर्चा झाली. कॉंग्रेसने मागच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाबाबत आग्रह धरला होता. त्यामुळे पुढील अधिवेशन नागपुरात घेण्याचं आश्वासन कॉंग्रेस नेत्यांना देण्यात आलं होतं. त्यानुसार अधिवेशनाची तारीख आणि स्थान आज जाहीर करण्यात आलं आहे. यानुसार आता पुढील अधिवेशन हे नागपुरात घेण्यात येणार असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.