Home Cities जळगाव जळगावमध्ये ग्रंथोत्सवाचा जागर पारंपरिक दिंडीने झाली दिमाखदार सुरुवात !

जळगावमध्ये ग्रंथोत्सवाचा जागर पारंपरिक दिंडीने झाली दिमाखदार सुरुवात !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावपळीच्या आणि डिजिटल युगातही शब्दांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, जळगाव शहरात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ चा शानदार शुभारंभ झाला. शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि व. वा. वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याने जळगावची सांस्कृतिक नगरी पुस्तकांच्या सुगंधाने दरवळली आहे.

ग्रंथदिंडीने वेधले लक्ष कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साही वातावरणात पारंपरिक ग्रंथदिंडीने करण्यात आली. महापौर दिपमाला काळे यांच्या हस्ते या दिंडीचे पूजन झाले. यावेळी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, डॉ. चंद्रशेखर पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या दिंडीने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले.

“वाचन हीच प्रगतीची गुरुकिल्ली” सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे अधिकृत उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकूर, सतीश पाटील आणि इतर मान्यवरांनी आपल्या मनोगतातून वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याची गरज व्यक्त केली. “तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी पुस्तकांमुळे मिळणारा आनंद आणि ज्ञान हे शाश्वत आहे,” असा सूर यावेळी उमटला. ग्रंथालय चळवळ अधिक बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांची आज मोठी गरज असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले.

परिसंवाद आणि प्रदर्शनाला प्रतिसाद ग्रंथोत्सवात आयोजित ‘कालानुरूप बदलती वाचनसंस्कृती’ या परिसंवादाने उपस्थितांची मने जिंकली. डिजिटल युगात वाचनाच्या पद्धती कशा बदलत आहेत, यावर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. यासोबतच लावण्यात आलेल्या विविध प्रकाशनांच्या स्टॉल्सवर विद्यार्थ्यांनी आणि पुस्तकप्रेमींनी पुस्तके खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

एआय आणि मराठी भाषा ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २५ मार्च रोजी “AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि मराठी भाषा” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर परिसंवाद होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात मराठी भाषेसमोर कोणती आव्हाने आहेत आणि संधी काय आहेत, यावर यावेळी मंथन होईल. तसेच संध्याकाळी रंगणाऱ्या कवीसंमेलनाने रसिक श्रोत्यांची सायंकाळ अविस्मरणीय ठरणार आहे.


Protected Content

Play sound