इस्लामाबाद (वृत्तसंस्था) पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांनी जैश ए मोहम्मदने पाकिस्तानी सरकारच्या सांगण्यावरूनच भारतात बाँबस्फोट घडवून आणले होते, असा गौप्यस्फोट केल्याने पाकिस्तान सरकार तोंडघशी पडले आहे. पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिया यांनी परवेझ मुशर्रफ यांची फोनवर मुलाखत घेतली. यावेळी मुशर्रफ यांनी जैशवर भारत सरकार करत असलेल्या कारवाईचे समर्थनही केले आहे. याच संघटनेने आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मुशर्रफ म्हणाले की, मी आधीपासूनच जैशला दहशतवाद्यांची संघटना म्हणत होतो. त्यांनी माझ्यावर दहशतवादी हल्ला केला. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. सरकार या संघटनेविरोधात कारवाई करत असल्याचा आपल्याला आनंद आहे. ही कारवाई याआधीच व्हायला हवी होती. डिसेंबर २००३ मध्ये पाकिस्तानमध्ये मुशर्रफ यांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये ते बालंबाल बचावले होते. तेव्हा त्यांनी जैशवर बंदी आणण्याचा दोनदा प्रयत्न केला होता.
मुशर्रफ यांनी लष्करशाहीचा वापर करत १९९९ मध्ये पाकिस्तानचा ताबा मिळवला होता. तेव्हा नवाझ शरीफ यांना हटवण्यात आले होते व ते राष्ट्रपती बनले होते. मात्र, नऊ वर्षांनी त्यांना सत्ता गमवावी लागली होती. यानंतर ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहत आहेत.