यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील दहीगाव येथून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका प्रौढ व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव सुरेश विठ्ठल महाले-कोळी (वय-४५) असे आहे. केळीच्या बागेत हा मृतदेह आढळून आला असून त्यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह जळगाव येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे.
सुरेश महाले हे गेल्या शनिवारपासून दहीगाव येथून बेपत्ता झाले होते. पोलिसांना प्राथमिक माहिती देऊन कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते, मात्र ते मिळून आले नाही तर मंगळवारी सकाळी ८.०० वाजेच्या सुमारास दहिगाव- कोरपावली रस्त्यावरील मनोहर नथु पाटील यांच्या शेतात (गट क्रमांक १९४) मध्ये केळीच्या बागेत मजूर शेतात काम करत असताना त्यांना सुरेश यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत त्यांनी गावात माहिती दिली असता कुटुंबीयांनी व गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह पाहून कुटुंबियांनी टाहो फोडला. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होत तपासाची दिशा ठरणार आहे. सुरेश महाले यांना दारूचे व्यसन होते. मात्र त्यांचे कोणाशी वैर नव्हते, असे नातेवाईकांनी म्हटले आहे. त्यांचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सुभाष विठ्ठल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत.