धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निसर्गकाव्याच्या अनुपम निर्मितीने मराठी साहित्यात अमीट ठसा उमटवणारे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त शहरातील काव्यरत्नावली चौकात एका भावपूर्ण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान आणि जळगावातील विविध साहित्यप्रेमी संघटनांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन झाले असून, उपस्थितांनी बालकवींना अनोख्या शैलीत अभिवादन केले.

कार्यक्रमात बालकवींनी लिहिलेल्या “औदुंबर” या अजरामर कवितेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कवितेच्या ओळींनी काव्यरत्नावली चौकात भावनांचा नवा झरा वाहिला. या वाचनाने उपस्थित रसिकांना बालकवींच्या कवितेतून निसर्गाशी एकरूप होण्याचा अनुभव दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवी तुषार वाघुळदे यांनी अत्यंत बहारदार पद्धतीने केले, तर आभार प्रदर्शन संदीप जोशी (सचिव, लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान) यांनी केले.

अध्यक्ष संग्राम जोशी यांनी आपल्या मनोगतात बालकवींच्या अवघ्या २८ वर्षांच्या आयुष्यात त्यांच्या लेखणीने केलेल्या अपार योगदानाचा गौरव केला. त्यांच्या मते, बालकवींची कविता ही मराठी साहित्यातील एक अमूल्य ठेव आहे, जी आजही ताजीतवानी वाटते. तुषार वाघुळदे यांनी बालकवींच्या निसर्गाशी असलेल्या आत्मीय संबंधावर भाष्य करताना सांगितले की, त्यांच्या कवितांमध्ये निसर्ग दृश्यात मानवी भावना उमटतात, पण ती कल्पनाविलास नसून संवेदनांची उत्कट अभिव्यक्ती आहे. त्यांनी बालकवी स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
किशोर कुळकर्णी (प्रसिद्धी विभाग, जैन इरिगेशन) यांनी भादली येथील बालकवींच्या स्मृतिस्थळासाठी रेल्वे मंत्रालयाशी पाठपुरावा केलेल्या आठवणी शेअर करत, स्मारक उभारणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. त्यांच्या या कृतीला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला यश पाटील, संजय खेडकर (वन विभाग), जगन्नाथ क्षीरसागर (फुफनगरी), मयूर अरुण चौधरी, गजानन बोरनारे, सौ. निर्मला दामोदर पाटील (वरणगाव), प्रेमवीर पाटील यांसह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते. कवितेच्या माध्यमातून बालकवींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.



