भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ मंडळ रेल प्रबंधक यांच्याविरुद्ध आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसचे पदाधिकारी रमेश मांगीलाल जैन यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे याबाबत तक्रार नोंदवली असून याप्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून खुलासा निवडणूक आयोगाला खुलासा देण्यात आलेला आहे.
भुसावळ मंडळ रेल्वे प्रबंधक यांनी 11 एप्रिल रोजीच्या अधिसूचनेनुसार नेहरू रोडचे नामांतर कृष्ण कॉलनी असे केलेले आहे. मतदारांना प्रभावित करून विशिष्ट राजकीय पक्षाला मतदान व्हावे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे पदाधिकारी रमेश मांगीलाल जैन यांनी केला आहे. त्यामुळे मंडल प्रबंधक भुसावळ यांच्याविरुद्ध आदर्श आचार संहितेचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जैन यांनी जळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी, रावेर मतदार संघच्या भुसावळ कार्यालयात अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, रेल्वे मंडळ प्रबंधक कार्मिक यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 04 रावेर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक यांच्याकडे खुलासा सादर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, केवळ रेल्वे कॉलनीचे नाव बदलण्यात आलेले असून रेल्वे कॉलनीतील रोडचे नावात बदल केलेला नाही. तर सेंट्रल झोन रेल्वे कॉलनीचे नाव बदलून कृष्णा कॉलनी ठेवण्यात आले असल्याचे म्हटले आहे. रेल्वे फिल्टर हाऊस रोड, नेहरू रोड तसेच मिशन रोड यांची नावे पूर्वीप्रमाणेच आहेत. सदरची अधिसूचना प्रसिद्ध करणाऱ्या लिपिकाकडून चूक झाली असून त्याबाबत 16 एप्रिल रोजी शुद्ध पत्रक प्रसिद्ध करण्यात आल्याचे खुलाशात म्हटले आहे. रेल्वे कॉलनीचे जुने नाव बदलून नवीन नाव देण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे मंडळ प्रबंधक यांनी म्हटले आहे. दरम्यान, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कागद पत्राचे अवलोकन केले असता आदर्श आचार संहिता भंग न झाल्याचे म्हटले असून सदर अर्ज निकाली काढण्यात येत असल्याचे निवडणूक निवडणूक अधिकारी यांनी म्हटले असल्याचे कळते.