अमळनेर (प्रतिनिधी) राहुरी येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे यांच्या संकल्पनेतून सिन्नर तालुक्यातील मेंढी येथे सहारा व्यसनमुक्ती केंद्राच्या परिसरात उभ्या राहणाऱ्या शिव आश्रमाच्या पायाभरणीसाठी शनिवार (दि.२३) तिथीप्रमाणे असलेल्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवाश्रमाचा पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रकल्पासाठी बक्षीसपत्राने जागा देणाऱ्या सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मधुकर गीते व त्यांच्या पत्नी सौ. शीला गीते तसेच प्रख्यात अभिनेते सचिन गवळी व सौ. स्मृति गवळी या दांपत्याच्या हस्ते यावेळी पायाभरणी करण्यात आली. यावेळी शिवाश्रमाचे संकल्पक शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
समाजातील दिव्यांग घटकांच्या आर्थिक व सामाजिक उत्कर्षासाठी डॉ. तनपुरे यांनी शिवाश्रमाची संकल्पना मांडली आहे. दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे, यासाठी डॉ. तनपुरे यांची धडपड सुरू आहे. आपल्या शिवगर्जना व शिवायण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारी बिदागी तनपुरे महाराज बाजूला काढून ठेवत आहेत. तसेच धर्मदाय आयुक्तांकडे देखील त्यांनी सार्वजनिक न्यास नोंदणी केली आहे. शिवाश्रम हा समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीतून उभा राहत असून अनेकांनी यथाशक्ती त्यासाठी योगदान देऊ केले आहे. शिर्डी विमानतळ परिसरात या प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्यात आली होती, मात्र तेथे मूळ जागेच्या मालकीबद्दल तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या भूमिपूजन व पायाभरणीचा कार्यक्रम गतवर्षी रद्द करावा लागला होता. आता मात्र येथील गीते कुटुंबीयांनी जागेची अडचण सोडवली असून सहारा व्यसनमुक्ती मुक्ती केंद्राच्या दक्षिण बाजूस ५० गुंठे मालकीची जागा शिवाश्रमासाठी दान केली आहे. मागील महिन्यात १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी या जागेवर भूमिपूजन करण्यात आले. तसेच तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीच्या दिनी मान्यवरांच्या हस्ते बांधकामाच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला. शिर्डी येथे १७ मार्च रोजी झालेल्या बैठकीत डॉ. तनपुरे यांच्या उपस्थितीत शिवाश्रमाच्या उभारणीत तन-मन-धनाने योगदान देणाऱ्याची बैठक झाली. हॉटेल निसर्ग येथे झालेल्या बैठकीत अनेकांनी शिवाश्रमासाठी यथाशक्ती मदत केली. यावेळी भु दाते मधुकर गीते, शीला गीते, साई आदर्श मल्टी स्टेट बँकेचे अध्यक्ष शिवाजी कपाळे, उद्योजक मुकुंद शिकणार सिनगर, पत्रकार प्रभाकर बेलोटे, निलेश शिंदे, राहुल कोळसे, सुनिता सावंत, सतीष उखर्डे ,विलास पटणी, शामराव खुळे ,नानासाहेब शिंदे, संजय चव्हाणके, शिवनाथ कापडी, मनीषा तनपुरे, बाळकृष्ण तनपुरे, गौरव तनपुरे आदी उपस्थित होते. या बैठकीत शिव आश्रमाच्या पायाभरणी कार्यक्रमाची नियोजन करण्यात आले, त्यामुळे हा कार्यक्रम नियोजित दिनी संपन्न झाला.