Home पर्यावरण कृषिधन 2026 मध्ये केळी स्पर्धांची रंगत; शेतकऱ्यांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनाला मान्यवरांची दाद

कृषिधन 2026 मध्ये केळी स्पर्धांची रंगत; शेतकऱ्यांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनाला मान्यवरांची दाद


फैजपूर,  ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  कृषी विज्ञान केंद्र पाल व कृषी विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कृषिधन 2026’ कृषी प्रदर्शनाचा आज दुसरा दिवस शेतकरी, तज्ज्ञ आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे विशेष गाजला. आधुनिक शेती, नव्या तंत्रज्ञानासोबतच केळी उत्पादन आणि केळी प्रक्रिया उद्योगाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांमुळे प्रदर्शन परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक मान्यवरांनी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये शरद महाजन तसेच डॉ. सुनील चौधरी (सावदा) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयोजित केळी घड स्पर्धा आणि केळी पाककला स्पर्धेला शेतकरी व महिला सहभागींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केळी घड स्पर्धेत एकूण ११ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला, तर केळी पाक स्पर्धेत २० स्पर्धक सहभागी झाले होते.

केळी घड स्पर्धेचे परीक्षण डॉ. चंद्रशेखर गुळवे व त्यांच्या पथकाने केले, तर केळी पाककला स्पर्धेचे परीक्षण डॉ. लता मोरे व त्यांच्या पथकाने केले. केळी घड स्पर्धेत प्रमोद भागवत वाघुळदे यांनी प्रथम, लोमेश निळकंठ बोरोले (बामणोद) यांनी द्वितीय आणि डिगंबर पुरुषोत्तम नेहेते (खिरोदा) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. नितीन वासुदेव चौधरी (भालोद) आणि अतुल लीलाधर पाटील (चितोडा) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

केळी पाककला स्पर्धेत रुचिता लोकेश रडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर शोभा अंबादास वारके यांनी द्वितीय आणि पूनम उत्तम सरोदे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. दामिनी दीपक सरोदे व अरुणा सुरेश सरोदे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

बक्षीस वितरण सोहळा माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर डॉ. अरुणाताई चौधरी, डॉ. प्रकाश बोरोले, श्री. अशोक झांबरे, श्रीमती विजयाताई बोंडे, श्री. अजित पाटील, श्री. प्रभात चौधरी, डॉ. व्ही. आर. पाटील आणि श्री. सुधाकर झोपे उपस्थित होते.

कार्यक्रमात केळी शास्त्रज्ञ डॉ. तुषार गोरे यांनी केळी पिकावरील नवीन तंत्रज्ञान, उत्पादनवाढ आणि गुणवत्ता सुधारणा याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. अरुणा चौधरी यांनी केळी पाककलेतील पदार्थांना योग्य गंध, चव आणि पौष्टिकतेचे महत्त्व अधोरेखित करत केळी हे स्वस्त, पौष्टिक आणि बहुपयोगी अन्न असल्याचे सांगितले, तसेच या पदार्थांना व्यापक प्रसिद्धी मिळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केळी घड पाहून समाधान व्यक्त करत खान्देशातील शेतकरी मेहनतीने दर्जेदार उत्पादन घेत असल्याचे कौतुक केले. केळी उत्पादनासोबत केळी प्रक्रियाधारित व्यवसाय अधिक विस्तारावेत, यासाठी त्यांनी शेतकरी व उद्योजकांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. धीरज नेहेते यांनी मानले. कृषिधन 2026 च्या दुसऱ्या दिवशी केळी उत्पादन व प्रक्रियेला मिळालेली ही दाद शेतकऱ्यांसाठी नवी ऊर्जा देणारी ठरली.


Protected Content

Play sound