पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा येथे मानसिंगका मिलच्या प्रांगणात दि. २६ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या सुमित किशोर पाटील आयोजित ‘जागर शक्तीचा – उत्सव भक्तीचा’ – ‘जल्लोष – २०२२‘ च्या दुसऱ्या दिवशी साऱ्यांचेच आकर्षण ठरलेल्या अवघ्या अडीच वर्षांची स्पर्धक चिमुकली लावण्याचा गुणगौरव करण्यात आला.
बालकांच्या गटात लावण्याने गरबा दांडियाचा उत्कृष्ट गणवेश परिधान करत केलेल्या नटखट हालचाली उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी मुकुंद बिल्दीकर यांनी ११०० रुपयांचे रोख पारितोषिक देऊन चिमुकल्या लावण्याचा गुणगौरव केला. त्यावेळी दुर्गा मातेचा जयघोष व टाळ्यांनी आसमंत दुमदुमला. जल्लोष गरबा दांडियाच्या दुसऱ्या दिवशी आदिशक्ती देवीचा जागर व आरती करण्यात आली.
याप्रसंगी स्पर्धेचे प्रायोजक मुकुंद बिल्दीकर, मुख्य आयोजक सुमित किशोर पाटील, आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्ष सुनिता पाटील, मयुरी बिल्दीकर, आदित्य बिल्दीकर, शिवसेनेचे शहर प्रमुख किशोर बारावकर, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, माजी नगरसेवक सतिश चेडे, अपूर्व थेपडे, संदीप महाजन, राहुल पाटील, भूषण पेंढारकर, जितेंद्र काळे, गुड्डू शेख, धनराज पाटील, शितल महाजन, प्रा. डॉ.. वैष्णवी महाजन, मिलिंद सोनवणे, अनिल येवले, विजय भोई, सुमित सावंत, संदिपराजे पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, नितीन सूर्यवंशी, सुभाष जाधव आदी उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशीही नाव नोंदणीसाठी स्पर्धकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. नवरात्रीच्या दुसऱ्या माळेचा लाल रंगाचा पेहराव केलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. लाल रंगाचे परफेक्ट मॅचिंग असलेल्या महिलांना कुपन देऊन त्यातून पैठणीसाठीचा ड्रॉ काढण्यात आला. नाशिक येथील अमोल पालेकर ऑर्केस्ट्रा कंपनीच्या सूर व संगीताची जुगलबंदी, दोंडाईचा येथील उजाला साऊंडचा स्फूर्तीदायी ठेका, सुयोग्य प्रकाश रचना तसेच स्पर्धकांनी केलेला गरबा दांडियाचा अत्यंत रेखीव व मनोहरी पेहराव अशा प्रसन्न वातावरणात दुसऱ्या दिवसाची स्पर्धा पार पडली.
बालक, महिला व पुरुष अशा तिघांचे स्वतंत्र दांडिया व गरबा राऊंड घेण्यात आले. परीक्षक म्हणून शितल महाजन, प्रीती बोथरा, उर्वशी मोर, दुष्यंत खंडेलवाल, मनिवेल सालोमन यांनी काम पाहिले. आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या विविधांगी विकास कामांसंदर्भातील प्रश्नांवर आधारित उत्तरे देणाऱ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
दुसऱ्या दिवशी मोनिका मिस्तरी, मेघा भांडारकर, माधुरी राऊळ, स्मिता पाटील, जयश्री विसपुते, ज्योती चौभे, निकिता महाजन, राजेंद्र ठाकरे, शुभम खैरनार, तेजस येवले, विजया पाटील हे पैठणी व बक्षिसाचे मानकरी ठरले. यावेळी विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.