जळगाव प्रतिनिधी। शहरातील मेहरुण तलाव परिसरात शनिवारी एका पादचारी तरुणास लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगारास आज पोलिसांनी अटक केली आहे.
या संदर्भात अधिक असे की,मेहरुण तलाव परिसरातील जे.के.पार्क येथून पायी चालत असलेल्या मोमीन शफीक या तरुणास एका भामट्याने मारहाण करुन त्याच्या खिशातील ३ हजार ५०० रुपये लुटल्याची घटना शनिवारी सकाळी ८ वाजता घडली होती. दरम्यान, पोलिसांनी तपासचक्रे फिरवून शनिवारी रात्रीच रिजवान शेख गयासुद्दीन उर्फ काल्या (रा.तांबापुरा) याला अटक केली होती. सुरुवातीस त्याने गुन्हा केल्याबाबत नकार दिला. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, काल्या याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.
काल्या हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अशा प्रकारचे गुन्हे करण्याची त्याची पद्धत असल्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला होता. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, इमरान सैय्यद, सचिन पाटील, असीम तडवी यांच्या पथकाने त्याला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक रमेश वावरे व रतीलाल पवार तपास करीत आहेत.