रायपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्याची घोषणा भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे. मुख्यमंत्रीपदी आदिवासी नेते विष्णुदेव साय यांच्या नावाची घोषणा केली आहे. रायपूरमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बेठकीत साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, अर्जुन मुंडा आणि दुष्यंत कुमार गौतम यांच्याशिवाय छत्तीसगड भाजपाचे प्रभारी ओम माथूर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. विष्णुदेव साय हे आदिवासी समाजातून येतात. छत्तीसगडमध्ये त्यांना मुख्यमंत्री बनवून भाजपानं देशभरात संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सूत्रांनुसार, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं मुख्यमंत्रिपदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, ज्यावर सर्व आमदारांचं एकमत झाले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दावेदार होते. त्यात माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांचं नावही आघाडीवर होतं. तसेच अरुण साव, ओपी चौधरी आणि रेणुका सिंह यांच्या नावांची देखील चर्चा होती. मात्र केंद्रीय नेतृत्वानं विष्णुदेव साय यांना पसंती दिली.
विष्णुदेव साय हे कुनकुरी मतदारसंघातून आमदार निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या उद मिंज यांचा पराभव केला. विष्णुदेव यांना ८७६०४ तर उद मिंज यांना ६२०६३ मतं मिळाली. विष्णुदेव साय छत्तीसगड भाजपाचे अध्यक्षही राहिले आहेत. याशिवाय ते रायगड मतदारसंघातून खासदारही राहिले आहेत. नुकत्याचं झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं दणदणीत विजय मिळवला आहे.