‘द एंजल्स फूड’चे स्वयंसेवक ठरताहेत भुकेल्या गरजूंचे अन्नदूत ! ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । एकीकडे अन्नाची नासाडी तसेच वाया जाणार्‍या अन्नाला सरळ कचरापेटीत टाकण्याची प्रवृत्ती तर दुसरीकडे एकेक घासासाठी मोताद झालेल्यांचा व्याकुळ समुदाय अशा विषमतेला दुर करण्याचे काम जळगावातील ‘एंजल्स फुड’ या चळवळीचे स्वयंसेवक करत आहेत. शहरातल्या कान्या-कोपर्‍यातून वाया जाणारे अन्न हे भुकेल्यांपर्यंत पोहचवण्याचे काम हे एंजल्स म्हणजेच देवदूत करत आहेत. याबाबत लाईव्ह ट्रेंडस् न्यूजने बनविलेला हा खास वृत्तांत आपल्यासाठी सादर करत आहोत.

संघर्ष भुकेचा !

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. त्यातही अन्न पहिल्या क्रमांकावर आहे. कुठल्याही सजीवाचे शरीर हे एका नैसर्गिक यंत्रासारखे असते, आणि यंत्र म्हटले की, त्याला इंधन हे लागतेच. अन्न हे सजीवांचे इंधनच असल्यामुळे ते पहिली गरज ठरते. एवढे महत्वाचे असलेले अन्न आज २१ व्या शतकातही प्रत्येक सजीवालाच नव्हे तर प्रत्येक मानवालाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकत नाही, हेच खरे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे. अशा हतबल करणार्‍या परिस्थितीत हरला असता तर मानवाने आज एवढी प्रगती केलीच नसती. त्यामुळेच आज प्रत्येकजण आपापल्या परीने भुकेशी संघर्ष करताना दिसतोय. त्यात काही लोक मात्र हा संघर्ष, ही धडपड व्यापक पातळीवर करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना चांगले यशही मिळताना दिसत आहे.

दररोज शिल्लक अन्नाचे वितरण

जळगाव शहरातही ‘द एंजल्स फूड’ नावाने कार्यरत असलेला एक गृप आज समाजातली भूक मिटवण्यासाठी नेटाने प्रयत्न करतोय. या प्रयत्नात या गृपचे सदस्य दररोज रात्री शहरातील काही हॉटेलातून शिल्लक राहिलेले व फेकले जाऊ शकणारे अन्न गोळा करतात आणि ते अन्न रात्रीच गरजू अन उपाशी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत आहेत. दररोज न चुकता हे स्वयंसेवक शहरातल्या सुमारे १५ हॉटेलातून अन्न गोळा करतात आणि अन्नाचा शेवटचा घास शिल्लक असेपर्यंत १५०-२०० लोकांची भूक भागवत असतात. याशिवाय लग्न अथवा धार्मिक समारंभातून शिल्लक राहिलेले अन्न ते दिवसाही गरजूंपर्यंत पोहोचवीत असतात. शहरातील गरिब व वंचितांच्या वस्त्या तसेच रेल्वे स्थानकावर याचे वितरण केले जाते.

दानियल शेखचा पुढाकार

जळगावातील उस्मानिया पार्कमधील रहिवासी तथा ललीत कला महाविद्यालयाचा विद्यार्थी दानियल शेख याला ही संकल्पना सुचली. एक दिवशी दानियल हा आपल्या भावासोबत हॉटेलमध्ये जेवायला गेला असतांना तो बिल देत असतांना पोलिसांची गाडी आली. त्यांनी दहा वाजल्याने हॉटेल बंद करण्याचे निर्देश दिले. यानंतर त्या हॉटेलच्या किचनमधून एक नोकर बाहेर येऊन अन्न फेकू लागला. तेव्हा दानियलने त्या हॉटेल मालकास ”हे अन्न गरिबांना का देत नाही ?” असा प्रश्‍न केला. यावर त्या हॉटेल मालकाने आपल्याकडे इतका वेळ नसल्याचे सांगितले. दानियलने तात्काळ आपण उद्यापासून दररोज रात्री तुमच्याकडे शिल्लक असणारे अन्न घेऊन गेल्यास आपण ते देणार का? असा प्रश्‍न केला. यावर होकार आल्यानंतर ‘द एंजल्स फूड’चे काम सुरू झाले. पहिल्याच रात्री त्यांनी जिल्हा परिषदजवळ एका साधूला अन्न दिल्यानंतर त्याने व्यक्त केलेली भावना पाहून दानियलने आपण हेच काम नेटाने पुढे नेण्याचा संकल्प केला. याला त्याचे मित्र तसेच वर्गमित्रांनी साथ दिली असून आता जवळपास २०० तरूण-तरूणींचा ग्रुप हे काम करत आहे. दररोज साधारणपणे १२-१५ जण यात सहभागी होतात. म्हणजेच हा ग्रुप साखळी पध्दतीने काम करत असून यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची सुखद बाब दिसून आली आहे.

मदतीचा हात हवा

महाविद्यालयात शिक्षण घेणारे हे तरुण स्वत:चे उत्पन्न नसतानाही काही हॉटेल मालकांच्या सहकार्याने हे मानवतावादी कार्य अविरतपणे पार पडत आहे. त्यांची ही धडपड लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना हातभार लावण्याचा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज चा हा अल्पसा प्रयत्न आहे. आपणही त्यांची मदत घेण्यासाठी किंवा करण्यासाठी ७७१९८९६८७३, ७७४४०१४७०३ व ९४२०१७१७७६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता. आपल्याकडे कोणत्याही कार्यक्रमातील शिल्लक राहिलेले अन्न हे गटार अथवा कचरा पेटीत जाण्याऐवजी कुणाच्या पोटात गेले तर हे केव्हाही चांगलेच नव्हे का ? तर मग, अन्न फेकण्याआधी एंजल्स फुडच्या स्वयंसेवकांची तळमळ डोळ्यासमोर आणा आणि त्यांना फोन करून अन्नाला भुकेल्यांच्या पोटात जाऊ द्या. आणि हो…आपल्याला जर वाटले तर या अन्नदुतांना अवश्य मदत करा.

पहा : ‘द एंजल्स फुड’च्या कार्याची माहिती Live Trends Newsचा हा स्पेशल रिपोर्ट ! !

Add Comment

Protected Content