प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची रक्कम पोस्टामार्फत निशुल्क मिळणार

जळगाव प्रतिनिधी । प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सहावा हफ्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाद्वारे जमा करण्यात आलेला आहे. या योजनेची रक्कम काढण्यासाठी बँकांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता भारतीय डाक विभागाच्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँके’ तर्फे सर्व लाभार्थ्यांना ही रक्कम वितरित करण्यासाठी विशेष निशुल्क सुविधा देण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बंकेमार्फत देण्यात येणाऱ्या AePS (Aadhar Enabled Payments System) या सुविधेद्वारे लाभार्थी स्वतःच्या कोणत्याही बँक खात्यातील रक्कम पोस्ट ऑफिसद्वारे घेऊ शकतात. या सुविधेसाठी बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न असणे आवश्यक आहे. या सुविधेसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते असणे बंधनकारक नाही.

पैसे काढण्यासाठी फक्त आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. ग्राहकाचा आधार क्रमांक व बोटांच्या ठशांचा वापर करून पैसे काढता येतात. एकावेळी ग्राहक आपल्या खात्यातून जास्तीत जास्त दहा हजार रुपये काढू शकतात.

या सुविधेसाठी लाभार्थी फोनवरून संबंधित पोस्टमन यांना संपर्क करून ही सुविधा घरपोच देखील घेऊ शकतात. जळगाव जिल्ह्यात पोस्ट विभागाच्या एकूण 458 शाखा ह्या ग्रामीण भागात व 77 शाखा ह्या शहरी तथा निमशहरी भागात कार्यरत आहेत.

तरी नागरिकांनी, विशेषतः प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांनी वरील सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन बँकांमध्ये होणारी गर्दी टाळावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Protected Content