यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, प्रतिनिधी । येथील पंचायत समितीचा प्रशासकीय कारभार सध्या पूर्णतः कोलमडला असून, गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारासह संपूर्ण विभागात सुरू असलेल्या बेशिस्त आणि भ्रष्ट कारभारामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधींच्या अभावाचा गैरफायदा घेत अधिकारी कुणालाही न जुमानता आर्थिक मोहापोटी सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करत असल्याचा गंभीर आरोप आता ग्रामस्थांनी केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून पंचायत समितीवर लोकप्रतिनिधींचे नियंत्रण नसल्याने प्रशासनावर कुणाचाही वचक राहिलेला नाही. घरकुल योजना, १५ वा वित्त आयोग आणि रोजगार हमी योजना यांसारख्या थेट जनसामान्यांशी निगडित असलेल्या विभागांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. ‘अर्थपूर्ण’ व्यवहार केल्याशिवाय कामे होत नसल्याने शेतकरी आणि कष्टकरी ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे.

जनसभा होऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ विशेष म्हणजे, खासदार, स्थानिक दोन्ही आमदार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत दोन वेळा पंचायत समितीच्या सभागृहात जनसभा पार पडल्या. या सभांमध्ये ग्रामस्थांनी पुराव्यासह भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मात्र, वरिष्ठांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चेचा प्रशासनावर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराविरोधात आजवर अनेकदा उपोषणे आणि आंदोलने करण्यात आली आहेत. तरीही येथील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यास तयार नाहीत. आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी अधिकारी नियमांना केराची टोपली दाखवून सोयीस्कर कारभार करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन जेव्हा लोक ग्रामपंचायतीकडे जातात, तेव्हा त्यांना तिथून पंचायत समितीकडे बोट दाखवले जाते आणि पंचायत समितीत गेल्यावर आर्थिक मागणी केली जाते. या दुष्टचक्रात सामान्य माणूस भरडला जात आहे. “तालुक्यातील नागरिकांच्या या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी कधी गांभीर्याने लक्ष देणार? की भ्रष्टाचार करणाऱ्या या अधिकाऱ्यांना अभय दिले जाणार?” असा संतप्त सवाल तालुक्यातील ग्रामस्थ विचारत आहेत.



