एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी म्हसावद रस्त्यावरील दादासाहेब पाटील महाविद्यालयातील बंदिस्त सभागृहात करण्यात येणार असून मतदान यंत्र कडक सुरक्षा यंत्रणेत ठेवण्यात आले आहेत.मतदान यंत्रासाठी केंद्रीय तसेच राज्य राखीव पोलीस दल तसेच महाराष्ट्र पोलीस यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मतदान यंत्र असलेल्या खोलीसह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेले मतदान यंत्र कडक सुरक्षा यंत्रणेत ठेवण्यात आले आहेत.मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी केंदीय राखीव सुरक्षादलाचे २६ जवान व दोन अधिकारी,तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे २४ जवान व दोन अधिकारी व महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मतमोजणीसाठी २३ टेबल ठेवण्यात आले असून त्यातील चौदा टेबलवर मतदान यंत्रातील मतमोजणी करण्यात येणार आहे. तसेच पोस्टल मतमोजणीसाठी सहा तर सेनादलातील जवानांचे मतमोजणीसाठी तीन टेबलवर करण्यात येणार आहे.
मतमोजणीच्या एकूण २२ फे-या होणार असून प्रत्येक फेरीनंतर लाऊड स्पीकरद्वारे उमेदवारांना मिळालेली मते जाहीर करण्यात येणार आहेत. मतमोजणीसाठी ४४ कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये दोन राखीव कर्मचा-यांचा समावेश आहे.तसेच १६ अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी उमेदवारांच्या एजंटला प्रवेशपत्र देण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड असून पारोळा व एरंडोलचे तहसीलदार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.
सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होण्याची शकयता आहे.मतमोजणी केंद्राबाहेर होणा-या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनातर्फे घेण्यात आली असून तशा सुचना सर्व उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. मतदारसंघातील नागरिकांनी मतमोजणीनंतर शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी केले आहे.