Home Cities जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ २३ डिसेंबरला

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ २३ डिसेंबरला

0
150

जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ मंगळवार, दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात उत्साहात संपन्न होणार असून, या समारंभासाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, विद्यापीठ परिसरात समारंभपूर्व उत्साहाचे वातावरण आहे.

या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी भूषविणार असून, राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC), बंगळूरूचे संचालक प्रा. गणेशन कन्नबीरन हे दीक्षांत भाषण करणार आहेत. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि उच्च शिक्षणातील मूल्यांवर त्यांच्या भाषणात भर राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यंदा एकूण २९ हजार ९७ विद्यार्थ्यांनी दीक्षांत समारंभासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १२,२५९, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ४,५९९, मानवविज्ञान विद्याशाखेचे ६,४१९ तसेच आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे २,२६० स्नातकांचा समावेश आहे. स्वायत्त महाविद्यालयांतील एकूण ३,५६० विद्यार्थ्यांनाही यावेळी पदवी प्रदान केली जाणार आहे. याशिवाय १९५ पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांचा देखील या समारंभात सन्मान होणार आहे.

गुणवत्ता यादीतील १२० विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात येणार असून, यामध्ये ८८ मुले आणि ३२ मुलींचा समावेश आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या यशामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक परंपरेला नवे वैभव लाभल्याची भावना व्यक्त होत आहे.

विद्यापीठाशी विद्यार्थ्यांची आत्मीयता वाढावी आणि ब्रँडिंग व्हावे या उद्देशाने यंदाही पदवी प्रमाणपत्रासोबत “माझं विद्यापीठ, माझं ज्ञानवैभव” असा मजकूर असलेले स्टिकर विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. हे स्टिकर विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील प्रथमदर्शनी ठिकाणी लावावे, अशी अपेक्षा विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केली आहे.

विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सूचना व डिग्री कोड विद्यापीठाच्या [www.nmu.ac.in](http://www.nmu.ac.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पदवी ग्रहण करताना विद्यार्थ्यांनी डिग्री कोड व ओळखदर्शक कागदपत्रांसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे. पदवी प्रमाणपत्रांचे वितरण अभ्यासक्रमनिहाय विविध काऊंटरवर सुलभ पद्धतीने करण्यात येणार असून, समारंभानंतर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

जे विद्यार्थी समारंभास उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांना २६ डिसेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत विद्यापीठाच्या पदवी प्रदान विभागातून कार्यालयीन वेळेत प्रमाणपत्र घेता येणार आहे. एक महिन्याच्या आत प्रमाणपत्र न घेतल्यास, फेब्रुवारी २०२६ पासून टप्प्याटप्प्याने स्पीड पोस्टने प्रमाणपत्र पाठविले जाणार आहे.

समारंभासाठी सुवर्णपदकप्राप्त विद्यार्थ्यांना ठराविक पोशाखाचे पालन करणे आवश्यक असून, इतर विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचा सन्मान राखत नेटका पोशाख परिधान करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या दीक्षांत समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर होणार असून, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शहर बस सेवा तसेच विद्यापीठ परिसरात ई-रिक्षा सेवेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. समारंभस्थळी सकाळी ठीक ८.३० वाजता विद्यार्थी व निमंत्रितांनी उपस्थित राहणे आवश्यक असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांनी दिली.


Protected Content

Play sound