सांगली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । सर्वत्र गणेशोत्सवाचा थाटामाट सुरू असतानाच सांगलीत दरवर्षी अगदी गुप्तपणे, कोणताही गाजावाजा न करता बसवला जाणारा ‘चोर गणपती’ यंदाही भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरला. दीड दिवसासाठी बसवला जाणारा आणि विसर्जन न करता जपून ठेवला जाणारा हा गणपती म्हणजे केवळ एक धार्मिक प्रतीक नसून, सांगलीच्या एकात्मतेच्या संस्कृतीचेही अभिमानास्पद प्रतिक आहे. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस अगोदर हा गणपती बसवण्याची ही अनोखी परंपरा आहे.

श्री गणपती पंचायतन संस्थानच्या प्रमुख गणेश मंदिरात गेल्या १५० वर्षांपासून ही अनोखी परंपरा अविरत सुरू आहे. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधीच, अत्यंत साधेपणाने आणि कोणालाही न कळता, कागदी लगद्यापासून तयार केलेल्या गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. मूर्तीची प्रतिष्ठापना होते तीही पूर्णतः गुप्त पद्धतीने. ना ढोल-ताशा, ना मिरवणूक, ना घोषणाबाजी – म्हणूनच या गणपतीला स्थानिकांनी ‘चोर गणपती’ असे नाव दिले आहे.

विशेष बाब म्हणजे ही मूर्ती विसर्जित न करता, दरवर्षी दीड दिवसांच्या पूजनानंतर सन्मानाने ठेवून दिली जाते. पुढील वर्षी त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना पुन्हा केली जाते. गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना, ही परंपरा त्याचे आदर्श उदाहरण बनली आहे. मूर्ती न विसर्जित करता पुन्हा वापरण्याची ही शतकांपूर्वीची शुद्ध पर्यावरणीय जाण आजच्या काळातही प्रेरणा देणारी ठरते.
या मंदिराच्या प्रांगणात ‘एकात्मता मंदिर’ही आहे, जेथे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी आणि इतर धर्मांचे पवित्र ग्रंथ एकत्र ठेवले गेले आहेत. धार्मिकतेसोबतच सामाजिक सलोख्याचेही हे मंदिर प्रतीक ठरते. विविध धर्मांचे ग्रंथ एकाच ठिकाणी ठेवण्याची ही कल्पना आणि अंमलबजावणी, सांगलीच्या सर्वधर्म समभावाच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी येथील मुख्य गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होते आणि त्यानंतर पाच दिवस सुरू राहणाऱ्या उत्सवात देशभरातून भाविक सहभागी होतात. ‘चोर गणपती’ मात्र आधीच गुपचूप येतो आणि शांतपणे आपल्या जागेवर विराजमान होतो. भाविकांच्या मते हा गणपती नवसाला पावणारा असून, दरवर्षी येथे अनेक नवस पूर्ण झाल्याची साक्षात अनुभूती लाभते.
राजा विजयसिंह यांच्या काळात सुरू झालेली ही परंपरा आज श्री गणपती पंचायतन संस्थानच्या नेतृत्वाखाली अखंडपणे सुरू असून, श्रद्धा आणि शिस्तीचा उत्तम संगम दाखवणारा हा गणेशोत्सव इतर गणपती मंडळांसाठी प्रेरणादायी ठरतो. पारंपरिकतेला आणि सामाजिक बांधिलकीला समर्पित असलेली ही परंपरा सांगलीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठानाचा अविभाज्य भाग ठरली आहे.



