मुंबई | प्रतिनिधी मुंबईला नवीन महापौर मिळण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून आता ही निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ताधारी पक्षांकडून नगरसेवक गटांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बीएमसीमध्ये आरक्षण जाहीर झाल्यानंतर ३१ जानेवारी रोजी महापौरपदाची निवडणूक घेण्याची तयारी सुरू होती. मात्र, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नगरसेवक गटांची नोंदणी अद्याप पूर्ण न झाल्याने निवडणूक प्रक्रिया रखडली आहे.

दरम्यान, सोडत प्रक्रियेतून मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महापौरपदाची निवडणूक घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) ६५ नगरसेवकांच्या गटांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तथापि, या गटांची अधिकृत प्रमाणपत्रे अद्याप नगरसचिव कार्यालयात सादर करण्यात आलेली नाहीत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक घेता येणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, भाजप आणि शिंदे-शिवसेना हे दोन्ही पक्ष संयुक्त गट म्हणून नोंदणी करणार की स्वतंत्र गट तयार करणार, याबाबत राजकीय चित्र अद्याप अस्पष्ट आहे. भाजपचे ८९ तर शिवसेनेचे २९ नगरसेवक असून, दोन्ही पक्षांनी अद्याप आपापल्या गटांची नोंदणी केलेली नाही. प्रजासत्ताक दिनानंतर २७ जानेवारी रोजी भाजपकडून नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या देशाबाहेर असून ते शनिवारी रात्री उशिरा मुंबईत परतणार आहेत. त्यांच्या आगमनानंतर बीएमसी महापौरपदाची निवडणूक आणि सत्तावाटप प्रक्रियेला गती मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भाजपकडून लवकरच कोअर कमिटीची बैठक बोलावली जाणार असून, उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, बीएमसीच्या २२७ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते, तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर झाले. २२ जानेवारी रोजी सोडतीद्वारे महापौरपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले होते.



