मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत पुरेशी मते नसतानाही शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने चुरस वाढली आहे. महाविकास आघाडीच्या तिसऱ्या उमेदवारामुळे मतांची फाटाफूट होण्याची चिन्हे आहेत.भाजपने पाच उमेदवारांची घोषणा केली. काँग्रेसने एकच उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसची अतिरिक्त मते आणि ठाकरे गटाच्या मतांच्या आधारे नार्वेकर यांचे गणित जमू शकते. पण राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
विधान परिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या २३ मतांची आवश्यकता आहे. १०३ आमदार असलेल्या भाजपचे अपक्षांच्या मदतीने पाचही उमेदवार निवडून येऊ शकतात. ५० आमदारांचा पाठिंबा असलेल्या शिंदे गटाचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतील. ४२ आमदार असलेले अजित पवार गट दोन उमेदवार निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहे.
महायुतीचा ९ जागा जिंकण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. ठाकरे गट व शरद पवार गटाकडील मतांच्या आधारे एक उमेदवार निवडून येईल, पण शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने समीकरणे बदलली आहेत.महायुती ९ तर महाविकास आघाडी दोन जागा वाटून घेण्याची सत्ताधाऱ्यांची योजना होती. मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील रिंगणात राहिल्यास चुरस वाढू शकते.