जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जन आक्रोश मोर्चा काढत भ्रष्टाचारी सत्ताधारी मंत्र्यांविरोधात जोरदार निदर्शने केली. शिवतीर्थ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचारी मंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळे आणि प्रतिमा जाळून तीव्र निषेध व्यक्त केला.

जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान, कार्यकर्त्यांनी “भ्रष्टाचारी सरकारचा धिक्कार असो!”, “मंत्री महोदयांचा राजीनामा घ्या!” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सत्ताधारी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या मोर्चात पक्षाचे गटनेते गुलाबराव वाघ, माजी खासदार उमेश पाटील, करण पवार, निलेश चौधरी यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यकर्त्यांच्या हातात निषेधाचे फलक होते, ज्यावर भ्रष्टाचाराविरोधी घोषणा लिहिलेल्या होत्या.
या आंदोलनामुळे जळगाव शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जोरदार शक्तीप्रदर्शन केले. संजय सावंत यांनी यावेळी बोलताना, भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई न झाल्यास यापुढेही तीव्र आंदोलने केली जातील, असा इशारा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर एका शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. या जन आक्रोश मोर्चामुळे सामान्य जनतेच्या समस्यांकडेही सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.



