Home राजकीय ठाकरेंना मुंबई टिकवता आली नाही? निकालानंतर संजय राऊतांचा भाजप-शिंदेंवर थेट हल्लाबोल

ठाकरेंना मुंबई टिकवता आली नाही? निकालानंतर संजय राऊतांचा भाजप-शिंदेंवर थेट हल्लाबोल


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारण तापले असून, तब्बल २५ वर्षांची ठाकरे कुटुंबीयांची सत्ता संपुष्टात आल्याने आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली असून, “ठाकरेंना मुंबई टिकवता आली नाही का?” या प्रश्नावर त्यांनी थेट आणि आक्रमक भूमिका मांडली.

राज्यातील २९ महापालिकांच्या निकालात बहुतांश ठिकाणी भाजपचे कमळ फुलले असून, सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेतही भाजपने निर्णायक आघाडी घेतली आहे. या निकालामुळे मुंबईतील शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली असून, भाजप-शिवसेना शिंदे गटाची सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, सत्ता आणि पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जात असतील, तर अशा बळावर भाजपलाही देश टिकवता येणार नाही. एवढेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद टिकवू शकणार नाहीत आणि एकनाथ शिंदेही आपले सध्याचे पद टिकवू शकणार नाहीत, असा घणाघात त्यांनी केला.

राऊत यांनी दावा केला की, शिवसेनेचे ६० नगरसेवक फोडण्यात आले, मात्र त्यातील ९० टक्के उमेदवारांचा पराभव झाला. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोघांना मिळून ७१ जागांवर विजय मिळाला असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मराठी माणूस आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला, असे त्यांनी ठासून सांगितले. सत्ता नसली तरी जनतेचा पाठिंबा आमच्याकडे आहे, त्यामुळे पराभवाचा आरोप निरर्थक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांचा वापर केला. “एकनाथ शिंदे जयचंद ठरले नसते, तर भाजपच्या १०० पिढ्या उतरल्या असत्या तरी मुंबईवर भाजपचा किंवा महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता,” असा आरोप त्यांनी केला. शनिवार वाड्यावर इंग्रजांचा झेंडा फडकवणाऱ्यांची ही औलाद आहे, असे विधान करत त्यांनी शिंदेंवर जहरी टीका केली.

निकालानंतर राज ठाकरे यांच्या ट्विटवर, तसेच निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे हे ‘सर्वात मोठे लूजर’ ठरतील असे केलेल्या वक्तव्यावरही राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हा पराभव मानण्यास ते तयार नाहीत. मनसेला आणखी १० ते १२ जागा मिळायला हव्या होत्या, काही उमेदवार अत्यल्प फरकाने पराभूत झाले. मनसेचे उमेदवार जिंकून यावेत यासाठी शिवसेनेने पूर्ण ताकद लावली, बैठका घेतल्या, प्रचार केला, मात्र अपेक्षित यश मिळाले नाही, याबाबत दोन्ही पक्ष मिळून चर्चा करतील, असे त्यांनी सांगितले.

ठाकरे युतीत उद्धव ठाकरे यांना अधिक फायदा झाला आणि राज ठाकरे यांना अपेक्षित लाभ झाला नाही, या आरोपांवरही राऊतांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस भांडणे लावण्याचे काम करतात, अशी टीका करत त्यांनी सांगितले की, शिवसेना हा मुंबईतील मूळ पक्ष आहे. पूर्वी ८४ नगरसेवकांची ताकद होती, आता ती कमी झाली असली तरी राज ठाकरे यांच्या पक्षालाही केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकांमध्ये चढ-उतार होतच असतात, असे सांगत त्यांनी भाजपच्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


Protected Content

Play sound