मुंबई महापालिका रणधुमाळीत ठाकरे बंधूंची मास्टरस्ट्रोक रणनीती


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापू लागले असून, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरत आहे. भाजपने यंदा कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याचा निर्धार केला असल्याने ठाकरे बंधूंवर राजकीय दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोरी आणि फोडाफोडी टाळण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाची आणि धाडसी रणनीती आखल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई महापालिकेसाठी येत्या २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मनसे आणि ठाकरे गट यांची युती झाल्यास दोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवारांपैकी प्रत्येक प्रभागात केवळ एकालाच संधी मिळणार, हे निश्चित आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर होताच नाराज नेते शेवटच्या क्षणी भाजप किंवा शिंदे गटाशी हातमिळवणी करण्याची शक्यता आहे, हा धोका ठाकरे बंधूंनी आधीच ओळखला आहे.

ही संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी आदल्या दिवशी मनसे-ठाकरे गटाच्या युतीची औपचारिक घोषणा करणार असल्याची रणनीती आखण्यात आली आहे. २२ किंवा २३ डिसेंबर रोजी मुंबईत भव्य मेळाव्याचे आयोजन करून ठाकरे बंधू एकत्रितपणे युतीची घोषणा करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे उमेदवारी न मिळालेल्या नाराजांना दुसऱ्या पक्षाशी चर्चा करण्यासाठी किंवा पक्षांतरासाठी फारसा वेळ मिळणार नाही.

याशिवाय उमेदवारांची नावे जाहीर करण्याबाबतही अत्यंत सावध धोरण अवलंबले जाणार आहे. मनसे-ठाकरे गटामध्ये जागावाटप ठरल्यानंतर अंतिम उमेदवाराचे नाव जाहीर न करता संबंधित उमेदवाराला थेट पक्षाकडून फोन करून कळवण्यात येईल. त्यानंतर लगेचच अधिकृत एबी फॉर्म देण्यात येणार आहे. उमेदवारांची नावे शेवटच्या क्षणी जाहीर केल्याने बंडखोरांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास किंवा दुसऱ्या पक्षात जाण्यास वेळच मिळणार नाही, असा या रणनीतीमागील हेतू आहे.

भाजपकडे सध्या प्रचंड संघटनात्मक ताकद आणि आर्थिक संसाधने असून विविध प्रलोभनांच्या माध्यमातून इतर पक्षांतील नाराज नेत्यांना आपल्या गळाला लावण्याची मोठी यंत्रणा कार्यरत आहे. या यंत्रणेकडून सातत्याने विरोधकांतील असंतुष्ट घटकांचा शोध घेतला जातो. हा धोका ओळखून ठाकरे बंधूंनी शेवटच्या क्षणीच आपले सर्व राजकीय पत्ते उघडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, मनसे आणि ठाकरे गटामधील जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी शिवतीर्थावर युती आणि जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा केली असून या दोन्ही नेत्यांनी राज ठाकरे यांच्याशीही संवाद साधला आहे. राज ठाकरे आज त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार असून, साधारण गुरुवारी ठाकरे बंधू संयुक्तपणे युतीची घोषणा करतील, अशी माहिती मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.