Home राजकीय महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधू एकत्र मैदानात

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधू एकत्र मैदानात


मुंबई–वृत्तसेवा । मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून प्रचाराच्या धगधगत्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार असले, तरी यंदाची महापालिका निवडणूक राज्याच्या राजकीय इतिहासात वेगळी ठरणार हे निश्चित झाले आहे. कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू पहिल्यांदाच युती करून निवडणूक रणांगणात उतरले आहेत.

येत्या सोमवारपासून, म्हणजेच ५ जानेवारीपासून ठाकरे बंधूंच्या संयुक्त प्रचारसभांना प्रारंभ होणार आहे. मुंबई जिंकण्यासाठी दोन्ही नेत्यांनी कंबर कसली असून संयुक्त शक्तिप्रदर्शनावर भर देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रचार मोहिमेची सुरुवात मुंबईतील तीन प्रमुख ठिकाणांहून होणार आहे. मुंबई पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर उद्धव आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.

मुंबईपुरतेच नव्हे, तर ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मीरा-भाईंदर येथे प्रत्येकी एक संयुक्त सभा आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय, मुंबईबाहेरील नाशिक महापालिका निवडणुकीसाठीही ठाकरे बंधूंची एक भव्य संयुक्त सभा होणार आहे. अवघ्या १४ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे नियोजन करण्यात आले असून, संयुक्त सभांसोबतच दोन्ही नेत्यांच्या स्वतंत्र सभांचाही धडाका पाहायला मिळणार आहे.

आदित्य–अमित ठाकरे यांचेही संयुक्त शक्तिप्रदर्शन

ठाकरे बंधूंसोबतच पुढील पिढीही प्रचारात उतरल्याचे चित्र आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याही संयुक्त सभा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, युवासेनेचे ग्लॅमर आणि मनविसेची आक्रमकता एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे.

‘शिवतीर्थ’वर खलबते; संयुक्त वचननाम्याची तयारी

दरम्यान, उद्धव ठाकरे आज दुपारी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट देण्याची दाट शक्यता आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांच्या संयुक्त वचननाम्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येते. मुंबईच्या विकासासाठी ठाकरे बंधू कोणती नवी विकासब्लूप्रिंट मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसे उमेदवारांची ‘शिवतीर्था’वर हजेरी

मनसेचे मुंबईतील सर्व उमेदवार आज राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘शिवतीर्थ’वर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, काही मनसे कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले असले, तरी त्यांनी कोणताही अनुशासनभंग केलेला नसून बहुतांश उमेदवारांनी पक्षहितासाठी आपले अर्ज मागे घेतल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.


Protected Content

Play sound