मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्ला अखेर भारतात दाखल झाली आहे. कंपनीने आपले पहिले टेस्ला एक्सपीरियन्स सेंटर मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात (BKC) सुरू केले आहे. अंदाजे ४,००० चौरस फूट जागेतील या भव्य शोरूमच्या माध्यमातून टेस्लाने भारतीय बाजारपेठेत पहिलं पाऊल टाकलं आहे.

मुंबईतील हे शोरूम टेस्लाचे देशातील पहिले अधिकृत आणि भौतिक केंद्र ठरणार आहे. जागेचा भाडे दर दरमहा सुमारे ३५ लाख रुपये असून बीकेसीसारख्या उच्चभ्रू वाणिज्यिक भागात ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.

टेस्लाच्या या आगमनानंतर लवकरच दिल्लीसह इतर प्रमुख मेट्रो शहरांमध्ये अशाच अनुभव केंद्रांची मालिका सुरु होण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप भारतात कारखाना किंवा असेंब्ली युनिट सुरू करण्याच्या कोणत्याही योजना जाहीर केल्या नाहीत, मात्र हे शोरूम भारतीय ग्राहकांच्या प्रतिसादाची चाचपणी करण्यासाठीचा एक धोरणात्मक टप्पा मानला जात आहे.
सध्या या शोरूममध्ये Model Y ही टेस्लाची ऑल-इलेक्ट्रिक SUV प्रदर्शित करण्यात आली आहे. या उद्घाटनासाठी चीनच्या शांघायमधून सहा Model Y वाहने भारतात आयात करण्यात आली आहेत. सोशल मीडियावर शेअर झालेल्या फोटोमध्ये ही वाहने फ्लॅटबेड ट्रकमधून शोरूममध्ये नेली जात असल्याचे दिसून येते.
भारतातील बाजारासाठी टेस्ला Model Y चा नवीन रूपात सादर केलेला प्रकार दाखवणार आहे. गडद राखाडी रंग, काळ्या अलॉय व्हील्स आणि कूपे-शैलीचा देखणा सिल्हूट यामुळे ही SUV आकर्षक ठरत आहे. यामध्ये दोन प्रकार उपलब्ध असणार आहेत – Long Range RWD आणि Long Range AWD.
कारच्या आतील भागात काळा आणि पांढऱ्या रंगातील ड्युअल-टोन इंटीरियर, 15.4 इंचाचा टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग, यूएसबी-सी पोर्ट्स, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, व्हॉईस कमांड्स आणि मोबाईल अॅपवर आधारित प्रवेश अशी आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
भारतात Model Y ची किंमत सुमारे ₹59.89 लाखांपासून सुरु होत आहे. मात्र ही किंमत संपूर्णतः आयात केलेल्या (CBU) वाहनांवर भारत सरकारने लावलेल्या ७०% ते १००% आयात शुल्कामुळे वाढलेली आहे.
टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी या आयात शुल्कावर वारंवार नाराजी व्यक्त केली असून, भारतात टेस्लाच्या कार अधिक परवडणाऱ्या व्हाव्यात म्हणून कर कपातीची मागणी केली आहे. मात्र केंद्र सरकार स्थानिक उत्पादनावर भर देत असल्याने टेस्लाला भारतात उत्पादन युनिट उभारण्याचा आग्रह धरला जात आहे. अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
टेस्लाच्या मुंबईतील या पहिलेवहिल्या शोरूमच्या उद्घाटनाने भारतात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एक नव्या युगाची सुरुवात झाली आहे. ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो यावर टेस्लाचे भारतातील भवितव्य ठरणार आहे.



