Home क्राईम वाळूमाफियांची दहशत; ‘ट्रॅक्टरमुळे पीक खराब होते’ म्हटल्यावर सरळ शेतकरी कुटुंबाला मारहाण !

वाळूमाफियांची दहशत; ‘ट्रॅक्टरमुळे पीक खराब होते’ म्हटल्यावर सरळ शेतकरी कुटुंबाला मारहाण !

0
205

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात वाळूमाफियांनी आता अक्षरश: कायद्याची पायमल्ली करण्यास सुरुवात केली असून, त्यांची मुजोरी शिगेला पोहोचल्याचे चित्र कोऱ्हाळा शिवारातील एका गंभीर घटनेतून समोर आले आहे. आपल्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी वाळू वाहतूक करण्यास मनाई करणाऱ्या एका तरुण शेतकऱ्यासह त्याच्या भाऊ आणि आईला वाळू माफियांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच, यापुढे विरोध केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही दिली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळीमुळे पिकांचे नुकसान होत होते: ज्ञानेश्वर गोंडून कांडेलकर (वय ३४, रा. कोऱ्हाळा, ता. मुक्ताईनगर) हे मंगळवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांची आई कस्तूराबाई आणि भाऊ राहुल यांच्यासोबत त्यांच्या शेत गट क्रमांक २४ मधील शेतीत काम करत होते. त्याच वेळी, संशयित आरोपी गणेश अभिमन्यू इंगळे हा पूर्णा नदीतून वाळू भरलेला ट्रॅक्टर घेऊन त्यांच्या शेतातील रस्त्यावरून वाहतूक करत होता.

ज्ञानेश्वर कांडेलकर यांनी गणेश इंगळे याला विनंती केली की, “ट्रॅक्टरच्या वेगामुळे रस्त्यावरील धुळे उडून शेतातील उभ्या पिकांवर बसतात आणि यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे तुम्ही या रस्त्याने वाळूची वाहतूक करू नका.” याचा राग आल्याने इंगळे याने लगेचच फोन करून आपल्या अन्य साथीदारांना घटनास्थळी बोलावले. काही क्षणातच गणेश इंगळे याच्यासह निलेश अभिमन्यू इंगळे, रुपेश देवानंद इंगळे, भावलाल अर्जुन इंगळे, अभिमन्यू अर्जुन इंगळे, देवानंद अर्जुन इंगळे, नाना अर्जुन इंगळे आणि मुकेश देवानंद इंगळे (सर्व रा. कोऱ्हाळा) असे एकूण आठही जण जमा झाले.

या टोळक्याने कसलाही विचार न करता ज्ञानेश्वर कांडेलकर यांच्यासह त्यांची आई कस्तूराबाई कांडेलकर आणि भाऊ राहुल कांडेलकर यांना जातीय शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तिघेही जखमी झाले. मारहाणीनंतरही या वाळू माफियांनी आपली मुजोरी सोडली नाही. “जर पुन्हा आमच्या ट्रॅक्टरला किंवा वाळू वाहतुकीला अडवले, तर तुम्हाला जीवेठार मारून टाकू,” अशी गंभीर धमकी देऊन हे सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

या गंभीर प्रकारानंतर ज्ञानेश्वर कांडेलकर यांनी तातडीने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व आठ जणांविरोधात सविस्तर फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी मारहाण आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक संदीप वानखेडे हे करत आहेत. वाळू माफियांनी थेट शेतकऱ्याच्या कुटुंबावर हल्ला केल्याने तालुक्यात वाळूच्या अवैध धंद्यावर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर उभे राहिले आहे.


Protected Content

Play sound