जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर परिसरात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तडीपार गुंडाला जळगाव शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून एक धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून, त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील गेंदालाल मिल भागातील साईबाबा मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली. बापू सायकल मार्टच्या बाजूला असलेल्या कानळदा रोडवर एक तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस कर्मचारी अमोल अशोक ठाकूर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव तनवीर उर्फ तन्या रहीम शेख (वय ३० वर्ष, रा. गेंदालाल मिल) असे आहे. विशेष म्हणजे, आरोपी तनवीर याला उपविभागीय दंडाधिकारी जळगाव विभाग यांनी ७ फेब्रुवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत आरोपी शहरात विनापरवाना प्रवेश करून दहशत माजवत होता. पोलिसांनी आरोपीकडून ४० सेमी लांबीचा आणि लाकडी मूठ असलेला लोखंडी कोयता जप्त केला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



