
नालंदा-वृत्तसेवा । बिहारमधील नालंदा येथे मंगळवारी सकाळी शीतला मंदिरात झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत १० ते १२ जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

दीपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शीतला मंदिर परिसरात ही दुर्घटना घडली. दर मंगळवारी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र यावेळी अचानक वाढलेल्या गर्दीमुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांमध्ये अचानक गोंधळ निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गर्दीचे अयोग्य व्यवस्थापन ही मुख्य कारणे मानली जात आहेत.
घटनेनंतर तात्काळ प्रशासनाने बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी एसडीएम आणि इतर वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंदिर परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



