Home क्राईम कारचा भीषण अपघात : माजी उपनगराध्यक्षांचे सुपुत्र जागीच ठार !

कारचा भीषण अपघात : माजी उपनगराध्यक्षांचे सुपुत्र जागीच ठार !


धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | खाजगी कामासाठी एरंडोलकडे जात असताना धरणगाव येथील तरुणाच्या कारला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कार उलटून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी ३० मार्च रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास बोरगावनजीक घडली. अविनाश संजय चौधरी (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो धरणगावच्या माजी उपनगराध्यक्षा प्रतिभा चौधरी यांचा मुलगा होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश चौधरी हे पेशाने रुग्णवाहिका चालक होते. सोमवारी दुपारी ते आपल्या स्विफ्ट डिझायर कारने (क्रमांक MH 46 X 2636) वैयक्तिक कामासाठी बोरगावमार्गे एरंडोलकडे जात होते. बोरगाव गावाजवळून जात असताना समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, अविनाश यांची कार रस्त्यावर उलटली.

या अपघातात अविनाश यांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. मार इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे धरणगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे. यावेळी मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला असून नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी मोठी गर्दी केली होती.

अविनाश यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. एका उमद्या तरुणाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.


Protected Content

Play sound