Home क्राईम नवले ब्रीजवर भीषण अपघात : तीन वाहनांना पेट, ५ जणांचा मृत्यू तर...

नवले ब्रीजवर भीषण अपघात : तीन वाहनांना पेट, ५ जणांचा मृत्यू तर २० जखमी 

0
184

पुणे–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । पुणे शहरातील नवले ब्रीज परिसर पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरला आहे. रविवारी रात्री झालेल्या या भीषण घटनेत तीन वाहनांना पेट लागून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर किमान वीस जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर परिसरात काही काळासाठी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केले.

अपघात इतका भीषण होता की दोन कंटेनर आणि एका कारची एकमेकांना जोरदार धडक झाली आणि क्षणात वाहनांना आग लागली. जळालेल्या कारमध्ये एका कुटुंबातील सदस्य अडकले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाने काही तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. अपघातात जखमी झालेल्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवले ब्रीज परिसरात वारंवार अपघात घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. येथील रस्ता उताराचा असून वाहनांचा वेग नियंत्रित न राहिल्याने अशा घटना घडतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहतूक नियंत्रणासाठी बसवलेल्या कॅमेरे आणि सिग्नल यंत्रणा अपुऱ्या आहेत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

या घटनेवर माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी प्रशासनावर टीका करत संताप व्यक्त केला. “या पुलावर केवळ कॅमेरे लावून आणि रब्बलर बसवून उपयोग नाही. इथे योग्य वाहतूक नियोजन, पोलीस उपस्थिती आणि वेग नियंत्रणाचे उपाय आवश्यक आहेत. दरवेळी अपघात झाल्यानंतर केवळ पाहणी दौरे होतात, पण मूळ समस्या कायम राहते,” असे मोरे म्हणाले. तसेच माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सध्या अपघातस्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतूक हळूहळू सुरळीत केली जात आहे. पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाचे जवान अजूनही घटनास्थळी तैनात आहेत. या घटनेने पुन्हा एकदा नवले ब्रीजवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या अपघाताने संपूर्ण पुणे शहर हादरले असून नागरिक आणि जनप्रतिनिधी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत.


Protected Content

Play sound