Home क्राईम जळगाव-वावडदा मार्गावर भीषण अपघात ; दुचाकीस्वार तरुणाचा अंत !

जळगाव-वावडदा मार्गावर भीषण अपघात ; दुचाकीस्वार तरुणाचा अंत !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली ते वावडदा रस्त्यावर नेवरा मारुती मंदिराजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. समोरून येणाऱ्या भरधाव महिंद्रा पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे शिरसोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशी आहे घटना :
शिरसोली येथील रहिवासी जगदीश अशोक पाटील (वय ३७) हे १४ फेब्रुवारी रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास आपल्या हिरो स्प्लेंडर मोटारसायकलने (क्र. एमएच १९ बिडी ११६५) शिरसोलीकडून वावडदाकडे जात होते. ते नेवरा मारुती मंदिराजवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या भरधाव महिंद्रा वाहनाने (क्र. एमएच २० ईजी ६५२९) त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, जगदीश पाटील यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.

सतर्क ग्रामस्थांनी चालकाला पकडले :
अपघात घडल्यानंतर माणुसकी दाखवून जखमीला मदत करण्याऐवजी महिंद्रा वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, परिसरातील काही सतर्क ग्रामस्थांनी दुचाकीने या वाहनाचा पाठलाग केला आणि नायरा पेट्रोल पंपाजवळ त्याला अडवले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जगदीश यांचे नातेवाईक अनिल वसंत पवार व इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

हॉस्पिटलमध्ये मृत घोषित :
जखमी जगदीश यांना तातडीने रुग्णवाहिकेने जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे जगदीश यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलीस कारवाई
या प्रकरणी नातेवाईक अनिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात महिंद्रा वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, दोषी चालकावर कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


Protected Content

Play sound