Home क्राईम टोलनाक्याजवळ भीषण अपघात; कारचा चक्काचूर, भुसावळच्या महिलेचा अंत

टोलनाक्याजवळ भीषण अपघात; कारचा चक्काचूर, भुसावळच्या महिलेचा अंत


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या एका भरधाव कारचा ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नशिराबादजवळील टोलनाक्याजवळ गुरुवारी २२ जानेवारी रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात कार चालकासह एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून भुसावळच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार (क्र. एमएच १९ बीयू ७१८६) नशिराबादजवळ आली असता, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. वेगात असलेली ही कार महामार्गावरील दुभाजक (डिव्हायडर) तोडून थेट विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवर गेली आणि समोरून येणाऱ्या कंटेनरवर (क्र. जीजे ०१ डीएक्स ९४९७) जाऊन जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

या भीषण दुर्घटनेत कारमध्ये बसलेली झोया नदीम पठाण (वय २२, रा. भुसावळ) या महिलेचा गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर भुसावळ येथील प्रसिद्ध ‘सोना डेअरी’च्या संचालकांचा मुलगा अरबान खान (वय २६) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जळगाव येथील गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, नशिराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ऐन रात्री झालेल्या या थरारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound