Home क्राईम कोथळी जवळ भीषण अपघात; डिव्हायडरला धडकून तरुणाचा मृत्यू

कोथळी जवळ भीषण अपघात; डिव्हायडरला धडकून तरुणाचा मृत्यू

0
150

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी रस्ते अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत रामकृष्ण कठोरे (वय ५०, व्यवसाय चालक, रा. वढवे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या कुटुंबासह वढवे येथे वास्तव्यास असून चालक म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजेदरम्यान वढवे गावचे माजी सरपंच त्यांच्या घरी आले आणि पुतण्या राजेंद्र भागवत कठोरे यांचा मुलगा वैभव राजू कठोरे याचा कोथळी गावाजवळ मोटारसायकल अपघात झाल्याची माहिती दिली. अपघातानंतर वैभवला उपचारासाठी सरकारी दवाखाना, मुक्ताईनगर येथे नेण्यात आल्याचेही कळविण्यात आले.

ही माहिती मिळताच रामकृष्ण कठोरे यांच्यासह नातेवाईक दिनेश रमेश कठोरे, निळकंठ भास्कर सपकाळे आणि जीवराम भादू कोळी तात्काळ मुक्ताईनगर येथील सरकारी दवाखान्यात दाखल झाले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर वैभव कठोरे याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. नातेवाईकांनी पाहणी केली असता, वैभवच्या डोक्याला गंभीर मार लागलेला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे दिसून आले.

दवाखान्यात उपस्थित असलेल्या नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव राजू कठोरे हा सायंकाळी सुमारे ६.३० वाजता हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक MH-19-CP-3296) ने कोथळीहून मुक्ताईनगरकडे जात असताना कोथळी गावाजवळ खंडेराव मंदिरासमोर रस्त्यावरील डिव्हायडरला जाऊन धडकला. या जोरदार धडकेत तो गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२२/२०२५ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम १०६/१, २८१, १२५ अ, १२५ ब तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.


Protected Content

Play sound