
बीड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। परळी नगरपरिषदेत अवघ्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एमआयएम (AIMIM) ला सोबत घेतल्याने महायुतीत मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावरून शिवसेना शिंदे गटाने तीव्र नाराजी व्यक्त करत थेट गटातून बाहेर पडण्याचा इशारा दिल्याने परळीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेल्या निवडणुकीनंतर महायुतीतच संघर्ष उफाळून आल्याचे चित्र आहे.

परळी नगरपरिषदेत गटनेता निवडीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने एमआयएमला सोबत घेतल्याची बाब समोर येताच शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. एमआयएमसारख्या जातीवादी पक्षाला विश्वासात न घेता महायुतीत सामावून घेतल्याचा आरोप करत, शिवसेनेने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, शिवसेनेसोबत युती ठेवायची असेल तर एमआयएमला तात्काळ बाहेर काढावे किंवा आम्हाला गटातून बाहेर जाण्याची परवानगी द्यावी.
जिल्हाधिकाऱ्यांसमोर सह्या करताना कोणत्याही पक्षाचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता, तसेच एमआयएमला जवळ करण्याचा कोणताही निर्णय शिवसेनेचा नव्हता, असेही मुळूक यांनी स्पष्ट केले. हिंदुत्वाशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून, एकतर शिवसेना गटात राहील किंवा एमआयएम, दोघे एकत्र राहू शकत नाहीत, अशी ठाम भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटावरही टीका करत अंबादास दानवे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले.
परळी नगरपालिकेच्या निवडणुका मुंडे बंधू-भगिनींच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्या होत्या. एकूण ३५ जागांपैकी दोन जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्या होत्या, तर उर्वरित ३३ जागांवर झालेल्या निवडणुकीतही महायुतीने स्पष्ट वर्चस्व राखले. या निवडणुकीत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. धनंजय मुंडे आमदार असून पंकजा मुंडे मंत्री असल्याने, महायुतीच्या विजयात त्यांच्या नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका होती.
मात्र, निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने एमआयएमला गटात सामावून घेतल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. महायुतीतील समन्वयाचा अभाव आणि एकमेकांवर केलेले आरोप यामुळे आगामी काळात या वादाचे पडसाद राज्यपातळीवरही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या परळी नगरपालिकेतील संख्याबळ पाहता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे १६, भाजपकडे ७, शिवसेना शिंदे गटाकडे २, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे २, काँग्रेसकडे १, एमआयएमकडे १ तर अपक्षांचे ६ नगरसेवक आहेत. या समीकरणात एका जागेवरून निर्माण झालेला वाद महायुतीसाठी डोकेदुखी ठरत आहे.



