नार-पार गिरणा योजनेची लवकरच निघणार निविदा ! : फडणवीस

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नार-पार गिरणा प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली असून लवकरच याची निविदा लवकरच निघणार असल्याची महत्वाची घोषणा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज लखपती दिदी संमेलनात बोलत होते.

सह्याद्री पर्वतराजीतील नार-पार तसेच अन्य नद्यांचे पाणी गिरणा व अन्य नद्यांमध्ये नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जोडण्याचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून बासनात गुंडाळून ठेवण्यात आलेला आहे. यासाठी खान्देशातून अनेक आंदोलने झालीत तरी याबाबत काहीही ठोस निर्णय झाला नव्हता. यातच, काही दिवसांपूव केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी नार-पार योजनेला केंद्र सरकारने अमान्य केल्याचे जाहीर करताच मोठी खळबळ उडाली.

नार-पार व अन्य नद्यांचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. यामुळे राज्यपालांनी या प्रकल्पाला मान्यता दिल्याचे सत्ताधाऱ्यांनी जाहीर करून देखील याबाबत संशयकल्लोळ कायम होता. यातच माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी थेट गिरणा नदीपात्रात चोवीस तास उभे राहून आंदोलन केल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला होता.

या पार्श्वभूमिवर, आज जळगावात आयोजीत करण्यात आलेल्या लखपती दिदी या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार-पार गिरणा प्रकल्पाला सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत आधीच मान्यता दिलेली असून आता या प्रकल्पाची लवकरच निविदा निघणार असल्याची घोषणा केली. यामुळे आता हा बहुप्रतिक्षित प्रकल्प माग लागण्याचे संकेत आता मिळाले आहेत.

Protected Content