नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाची निविदा; नाशिक, जळगाव जिल्ह्यांना सिंचनाचा लाभ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांना मोठा लाभ देणाऱ्या नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पाचा पुढील टप्पा आता कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पाच्या निविदा जाहीर झाल्या असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एकूण खर्च ७ हजार १५ कोटी रुपये असून, त्याद्वारे ९.१९ टीएमसी पाणी गिरणा नदीत सोडण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यातील सिंचन प्रकल्पांना वेग देण्यासाठी १६० प्रकल्पांना फेर प्रशासकीय मान्यता दिली आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने आम्ही ठोस पावले टाकली असून, जलयुक्त शिवार-२ योजनेला सुरुवात केली आहे. तसेच नदीजोड प्रकल्पांवरही विशेष भर दिला जात आहे.”

मराठवाड्यात सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठे पाऊल
मराठवाडा हा कोरडवाहू प्रदेश असल्याने, तिथे पाण्याची समस्या मोठी आहे. यावर उपाय म्हणून नदीजोड प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “संभाजीनगर आणि जालना हे औद्योगिक क्लस्टर विकसित होत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासणार आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला संजीवनी मिळणार आहे.”

महाराष्ट्राने सोयाबीन खरेदीत मोडला विक्रम!
विरोधकांनी सोयाबीन खरेदीबाबत टीका केली असली, तरी मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी सादर करून महाराष्ट्राने सर्वाधिक सोयाबीन खरेदी केल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले, “मध्यप्रदेशात ६ लाख मेट्रिक टन, राजस्थानात ९८ हजार मेट्रिक टन, गुजरातमध्ये ५४ हजार मेट्रिक टन तर महाराष्ट्राने तब्बल ११.२१ लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली आहे. ही संख्या इतर राज्यांच्या तुलनेत १२८ टक्के अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी सर्वात पुढे आहे.”

नदीजोड प्रकल्पामुळे महाराष्ट्रात सिंचन क्रांती
नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांना सिंचनाचा मोठा फायदा होईल. गिरणा नदीच्या पात्रात ९.१९ टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून, ४९,७६१ हेक्टर क्षेत्र सिंचित होईल. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. राज्यातील सिंचन प्रकल्प जलद गतीने मार्गी लागत असून, यामुळे भविष्यात महाराष्ट्र हा जलसमृद्ध राज्य होण्याच्या दिशेने पुढे जात आहे.

Protected Content