जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूला खोली खाली करण्याच्या कारणावरून घरमालकाने लोखंडी पाईपने मारहाण करून दमदाटी केल्या प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल भानूदास चव्हाण (वय-३३) रा. रायपूर कुसुंबा ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रायपूर कुसुंबा येथील मनोज परदेशी यांच्या घरात भाड्याने राहतात. रविवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मनोज परदेशी याने अनिल चव्हाण याला खोली खाली करण्याचे सांगितले. दरम्यान, अनिलने खोली खाली करण्यास नकार दिल्याने मनोज परदेशी याने अनिलला शिवीगाळ करून लोखंडी पाईपाने चेहऱ्यावर मारहाण केली. या अनिल हा जखमी झाला आहे. तसेच तू कसे खोली खाली करत नाही ते मी बघतो अशी दमदाटी करून गटारीत ढकलून दिले. यासंदर्भात अनिल चव्हाण याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी मनोज परदेशी याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.