जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तेली प्रदेश महिला मंडळ जळगाव व शारदा एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांतीचे औचित्य साधून तेली समाज भगिनींसाठी भव्य दिव्य ‘हळदी-कुंकू’ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव शहरातील पांझरापोळ जवळील शाळा क्रमांक ३ च्या परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला समाज बांधवांच्या शेकडो महिला भगिनींनी उत्स्फूर्त हजेरी लावली. तिळगुळाचा गोडवा आणि एकमेकींना वाण लुटण्याच्या परंपरेसोबतच या कार्यक्रमात महिलांच्या कलागुणांना वाव देणारे विविध उपक्रम राबवण्यात आले.

दैनंदिन कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामाच्या व्यापात सदैव व्यस्त असणाऱ्या महिलांना काही काळ निवांत मिळावा, त्यांना विरंगुळा मिळावा आणि समाजातील सर्व महिलांनी एकत्र येऊन विचारांचे आदान-प्रदान करावे, या मुख्य उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात केवळ हळदी-कुंकूच नव्हे, तर महिलांच्या आरोग्याविषयी आणि सामाजिक विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थित महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

या सोहळ्यात सहभागी झालेल्या महिलांना विविध आकर्षक बक्षिसे आणि वाण देण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना तेली समाज महिला महानगराध्यक्ष मनीषा प्रदीप चौधरी, निर्मला चौधरी आणि बेबाबाई सुरेश चौधरी यांची होती. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांचा एकत्र येण्याचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
सूत्रसंचालन सुनंदा चौधरी, डॉ. सुषमा चौधरी आणि डॉ. सुजाता प्रदीप चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिया चौधरी, आशा चौधरी, मेघा चौधरी, सारिका चौधरी, प्रतिभा चौधरी, कविता चौधरी यांच्यासह तेली प्रदेश महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.



