Home राजकीय दहीसरमध्ये तेजस्वी घोसाळकरांचा दणदणीत विजय, ठाकरे गटाला ‘दे धक्का’

दहीसरमध्ये तेजस्वी घोसाळकरांचा दणदणीत विजय, ठाकरे गटाला ‘दे धक्का’


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला असतानाच दहीसरमधील वार्ड क्रमांक 2 चा निकाल विशेष चर्चेचा ठरला आहे. फेसबुक लाईव्ह खून प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या घोसाळकर कुटुंबातील राजकीय फाटाफुटीचा थेट परिणाम या निवडणुकीत दिसून आला. भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी नाराजी, पक्षांतर आणि अंतर्गत वाद पाहायला मिळाले. दहीसरमध्येही हेच चित्र होते. घोसाळकर कुटुंबातील पारंपरिक शिवसेना ठाकरे गटाशी असलेली नाळ तुटत तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केला आणि वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी मिळवली. त्यामुळे या लढतीकडे केवळ स्थानिक नव्हे तर संपूर्ण मुंबईचं लक्ष लागलं होतं.

निवडणूक मोजणीच्या सुरुवातीपासूनच तेजस्वी घोसाळकर आघाडीवर राहिल्या. दुसऱ्या फेरीअखेर त्यांना 11,964 मते मिळाली होती, तर ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार धनश्री कोलगे यांना केवळ 4,115 मते मिळाली. अखेरीस तेजस्वी घोसाळकर यांनी एकूण 16,484 मते मिळवत 10,755 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला, तर धनश्री कोलगे यांना 5,729 मतांवर समाधान मानावं लागलं.

या निवडणुकीत विशेष बाब म्हणजे एकेकाळच्या मैत्रिणी आमनेसामने आल्या होत्या. तेजस्वी घोसाळकर विरुद्ध धनश्री कोलगे अशी ही लढत निष्ठावंत विरुद्ध गद्दार, बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक चेहरा अशा अनेक मुद्द्यांवर रंगली होती. प्रचारादरम्यान धनश्री कोलगे यांनी ही लढत रस्त्यावरील काम करणारा कार्यकर्ता विरुद्ध टीव्हीवरील चेहरा अशी असल्याचं सांगितलं होतं. मात्र, मतदारांनी भाजपच्या उमेदवारालाच पसंती दिली.

धनश्री कोलगे या युवा सेना कार्यकारिणीच्या सदस्य असून दहीसरमधील वार्ड क्रमांक 2 मधून शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार होत्या. त्यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या कामाच्या जोरावर पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे, विनोद घोसाळकर यांचा त्यांना पाठिंबा असल्याचंही त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. विनोद घोसाळकर प्रचारात सक्रिय दिसत होते आणि सुनेने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भावूक झाल्याचं चित्रही समोर आलं होतं.


Protected Content

Play sound