रावेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात वाळू तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाच, तहसीलदार बंडू कापसे यांच्या मध्यरात्रीच्या धडक कारवाईने वाळू माफियांना जबर झटका दिला आहे. रावेर-अजंदा रस्त्यावर केलेल्या या कारवाईमुळे प्रशासनाच्या सजगतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून, या प्रकरणामुळे महसूल खात्याच्या अंतर्गत कार्यपद्धतीवरही नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सदर घटना रविवारी मध्यरात्री घडली. तहसीलदार बंडू कापसे यांना गोपनीय माहिती मिळाली की, MH 19 CX 3495 क्रमांकाचा एक डंपर अजंदा येथून रावेर दिशेने अवैध वाळू वाहतूक करत आहे. माहितीची गंभीर दखल घेत तहसीलदारांनी त्वरित महसूल पथकासह सापळा रचला आणि संबंधित डंपरवर छापा टाकत वाहन जप्त केले. ही कारवाई इतकी गुप्तपणे व अचूकपणे झाली की, वाळू तस्करांना सावरायलाही वेळ मिळाला नाही.

कारवाईनंतर डंपर रावेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला असून, पुढील कायदेशीर चौकशी सुरू आहे. या धाडीत तलाठी सुधीर इंगळे (नागसिंग), प्रशांत जाधव (खिरवड), आकाश तायडे (मोरगाव), मंडळ अधिकारी भांडेकर, अप्पा रसलपूर, तसेच कोतवाल गणेश चौधरी यांचा समावेश असलेल्या महसूल पथकाने सक्रिय सहभाग घेतला.
या कारवाईमधून एक गोष्ट ठळकपणे समोर आली की, तहसीलदार स्वतः मैदानात उतरल्यावरच ठोस कारवाई होत आहे. यामुळे रोज फील्डवर असणारे तलाठी व मंडळ अधिकारी केवळ रिपोर्टिंग पुरतेच मर्यादित राहिले आहेत काय? असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनातील या ढिलाईमुळेच वाळू तस्करी फोफावत असल्याचा आरोप काही स्थानिक नागरिक करत आहेत.
दरम्यान, या मध्यरात्रीच्या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली असून, यासंदर्भात विविध चर्चांना उधाण आले आहे. महसूल विभाग या प्रकरणानंतर तस्करीविरोधात अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण उपाययोजना करेल, अशी अपेक्षा आता स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे. या कारवाईने प्रशासनाच्या सजगतेचा प्रत्यय आला असला तरी, फील्ड पातळीवरील जबाबदाऱ्या अधिक पारदर्शकपणे पार पाडाव्या लागणार आहेत.



