जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वेतन वाढीच्या मागणीसाठी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सोमवार १३ मार्च रोजी सकाळपासून सामूहिक रजेवर गेले आहे. या अनुषंगाने जळगाव तहसील कार्यालयातील तहसीलदार व नायब तहसीलदार हे सामूहिक रजेवर गेल्याने कार्यालयात कामकाज रखडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी यापूर्वी महसूल मंत्री यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलेले आहे. दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील महसूल विभागातील काम करणारे तहसीलदार व नायब तहसीलदार हे राजपत्रित वर्ग-दोन मधील महत्त्वाचे पदावरील अधिकारी आहेत. परंतु नायब तहसीलदार यांना वेतन त्या पद्धतीने दिले जात नाही, या संदर्भात वेतन वाढविण्यासाठी १९९८ पासून आतापर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. दरम्यान यापूर्वी देखील तत्कालीन अप्पर मुख्य सचिव तथा तत्कालिन महसूल मंत्री यांनी बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. याची अंमलबजावणी न झाल्याने अखेर आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सोमवारी १३ मार्च रोजी तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी सामूहिक रजा घेतला आहे. त्यामुळे जळगाव तहसील कार्यालयात नायब तहसीलदार व तहसीलदार नसल्याने शुकशुकाट दिसून आला. दरम्यान आंदोलनाची दखल न घेतल्यास ३ एप्रिल पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.