Home Cities यावल दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद; किनगाव स्कूलमध्ये भावनिक निरोप समारंभ

दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद; किनगाव स्कूलमध्ये भावनिक निरोप समारंभ


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील किनगाव डोणगाव मार्गावरील किनगाव इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात आणि भावुक वातावरणात पार पडला. शाळेतील शिक्षक, पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील होते. यावेळी सचिव मनीष विजयकुमार पाटील, स्व. केतन दादा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका पुनम मनीष पाटील, मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील, उपमुख्याध्यापक सुहास भालेराव, इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक मिलिंद भालेराव आणि राजश्री अहिरराव यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला तसेच संगीत खुर्ची, अभिनय ओळखा, संवाद सादरीकरण अशा विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करून कार्यक्रमात रंगत आणली. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील अनुभव कथन करताना भावना व्यक्त केल्या. शाळेने आम्हाला घडवले, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रेम आमच्या आयुष्यात कायम प्रेरणादायी राहील, असे सांगताना अनेक विद्यार्थी भावुक झाले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच आम्ही कधी कठोर तर कधी प्रेमळ भूमिका घेत असतो. आदर्श नागरिक घडवणे हेच आमचे ध्येय असून, विद्यार्थ्यांनी जीवनात प्रगती करावी, हीच अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या अक्षय वराडे, अंतरा पाटील आणि निशा मिस्तरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन लक्ष्मी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 


Protected Content

Play sound