Home राज्य लवकरच होणार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती !

लवकरच होणार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती !


मुंबई-वृत्तसेवा | राज्यातील जिल्हा परिषद व खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे लवकरच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्याने हजारो तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी देओल यांनी रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रक्रियेनुसार, शिक्षक भरतीसाठी रोस्टर प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. खासगी शिक्षण संस्थांना त्यांच्या रिक्त पदांची माहिती सादर करण्यापूर्वी मागासवर्गीय कक्ष आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडून रोस्टर (बिंदूनामावली) प्रमाणित करून घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतरच ही माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाईल.

पोर्टलद्वारे भरलेल्या पदांनाच शासनाची मान्यता मिळणार असून अशा पदांनाच भविष्यात वेतनही लागू होणार आहे. यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाईल आणि पात्र उमेदवारांना न्याय मिळेल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, खासगी शाळांमधील क व ड वर्गातील अनुकंपा तत्त्वावरील पदेही तातडीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत प्राप्त 1048 प्रस्तावांपैकी 791 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून उर्वरित प्रस्तावांतील त्रुटी लवकरच दूर केल्या जाणार आहेत. तसेच खासगी शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन आता ऑनलाईन पद्धतीने पारदर्शकतेने केले जाणार आहे. यामुळे शिक्षकांना त्यांच्या सेवेत स्थैर्य मिळण्यास मदत होणार आहे.

याचबरोबर जिल्हा परिषदांच्या केंद्र शाळांचे समूह शाळांमध्ये रूपांतर करण्याचा विचारही शासन स्तरावर सुरू आहे. ज्या शाळांची पटसंख्या चांगली आहे, त्या ठिकाणी दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही देओल यांनी सांगितले.


Previous articleUPSC मध्ये जळगावची कन्या नंदिनी पाटीलची ऐतिहासिक झेप 
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound