Home Cities धरणगाव पी.आर. हायस्कूलमध्ये उत्साही वातावरणात शिक्षक-पालक व माता पालक सभा संपन्न 

पी.आर. हायस्कूलमध्ये उत्साही वातावरणात शिक्षक-पालक व माता पालक सभा संपन्न 

0
159


धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव येथील पी.आर. हायस्कूलमध्ये नविन शैक्षणिक वर्षातील पहिली शिक्षक-पालक व माता पालक सभा उत्साहात पार पडली. या सभेत शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या अडचणी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचे प्रयत्न आणि पालकांच्या सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षक आणि पालक यांच्यातील सुसंवाद वाढवण्यासाठी ही सभा उपयुक्त ठरली.

सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. एस. पाटील होते. मंचावर पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी, ज्येष्ठ शिक्षक डॉ. बापू शिरसाठ, रामचंद्र धनगर, गणेश सूर्यवंशी, सागर कासार आणि प्रतिभा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक करताना डॉ. बापू शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा ही कुटुंबानंतरची महत्त्वाची संस्था असल्याचे नमूद करत सहशालेय उपक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शारीरिक कसरती आणि क्रीडा यशाबद्दल माहिती दिली. पालक सभा ही या सर्व गोष्टींना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर पालक सभेचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक आणि पालक यांच्यात समन्वय साधण्याची गरज अधोरेखित करत, विद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या अडचणी, पालकांच्या सूचना आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी समर्पकपणे दिली.

या वेळी पालकांनी आपापल्या मुलांना शाळेत येताना भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या. या अडचणी दूर करण्यासाठी शाळा प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नवीन शैक्षणिक वर्षासाठी शिक्षक पालक सभेची व माता पालक सभेची कार्यकारणी निवडण्यात आली. शिक्षक पालक सभेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा डी. एस. पाटील यांची निवड झाली, उपाध्यक्ष विष्णू परदेशी, तर सदस्य म्हणून देविदास वराडे, सचिन सोनार, भास्कर बत्तीसे, गणेश परदेशी, श्रीराम महाजन, देविदास गायकवाड आणि विनोद महाजन यांची निवड झाली. माता पालक सभेसाठी अध्यक्ष म्हणून डी. एस. पाटील, उपाध्यक्षा प्रतिभा पाटील, आणि सदस्य म्हणून शारदा धनगर, वैशाली कोळी, संगीता पावरा यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारिणीचा अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सभेचे सूत्रसंचालन पालक सभा प्रमुख गोपाल चौधरी यांनी केले तर आभार पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी यांनी मानले. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही पालक सभा केवळ संवादाचा नव्हे, तर शाळा आणि समाज यांच्यातील सशक्त नातेसंबंध वृद्धिंगत करण्याचा एक प्रभावी उपक्रम ठरला.


Protected Content

Play sound