नवीदिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीचा प्रचार धडाक्यात सुरू आहे. प्रतिस्पर्ध्यांवर, विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत, टीका-टोले-टोमणेही दणक्यात सुरू आहेत. त्याचवेळी, वादग्रस्त विधाने, जीभ घसरण्याचे प्रकारही काही ठिकाणी होत आहेत. या यादीत आता आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटचे नेते बदरुद्दीन अजमल यांचे नाव जोडले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरलीय.
मोदींच्या विरोधात जी महाआघाडी तयार झालीय, त्यात आमचा पक्षही आहे. आम्ही सगळे विरोधक मिळून यावेळी मोदींना देशाबाहेर काढू. त्यानंतर एका कोपऱ्यात मोदींची चहाची टपरी असेल. चहासोबत ते भजीही विकतील, अशी अशोभनीय टिप्पणी बदरुद्दीन अजमल यांनी केली आहे. अजमल हे आसाममधील धुबरी मतदारसंघाचे खासदार असून १२ वर्षांपूर्वी त्यांनीच एआययूडीएफची स्थापना केली होती.
अजमल यांच्याआधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका करताना भाजपा खासदार उदय प्रताप सिंह यांचा तोल गेला होता. पूर्वी परदेशात भारतीय व्यक्ती गेली की तिथले लोक म्हणायचे चोरांच्या देशातून आलाय. परंतु, आता मोदींच्या भारतातून आल्याचं बोललं जातं. मोदींनी देशाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. उद्या राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास, भारताचा पंतप्रधान पप्पू आहे, अशी खिल्ली उडवली जाईल, असे विधान त्यांनी केलं होतं.