मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबत गैरवर्तन करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, खा. सुळे यांनी ट्विट करत टॅक्सी चालकाने केलेल्या गैरवर्तणूकीची तक्रार थेट रेल्वे मंत्र्यांकडेच केली.
सुळे यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे काल देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. कुलजीतसिंह मल्होत्रा हा प्रवाशांना भाड्यासाठी हुज्जत घालत होता. त्याने नंतर सुप्रिया सुळेंना गाठले आणि त्यांच्याशी हुज्जत घालू लागला. सुळे यांनी त्याला दोनदा नकार दिला. मात्र, मल्होत्राने सुप्रिया सुळेना पुढे जाऊ न देता अडवून धरले. इतकेच नाही, तर तो थेट मोबाईल काढून त्यांच्यासोबच सेल्फी काढू लागला. त्यानंतर सुळे यांनी ही माहिती ट्विटद्वारे रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार केली. त्यांनतर भारतीय रेल्वे कायद्यांतर्गत दादर आरपीएफने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याची रवानगी आरपीएफ कोठडीत केली.