तरूण कुढापा मित्र मंडळ ठरले दहीहंडी पारितोषिकाचे मानकरी (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एल.के. फाउंडेशनच्या वतीने शहरातील सागर पार्क मैदानावर मराठमोळी राजेशाही थाटाच्या दहीहंडीचे आयोजन आज शुक्रवार, दि. १९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजेपासून करण्यात आले. यावेळी जुने जळगावातील तरूण कुढापा मित्र मंडळाच्या गोविंदा पथक रात्री १० वाजता चौथ्या थरावरून दहीहंडी फोडून पारितोषिकाचे मानकरी ठरले.

याप्रसंगी कोरोनाच्या विळख्यानंतर जळगावकर नागरिकांना तब्बल दोन वर्षानंतर तीच धून तोच जोश तरूणांनी अनुभवला. जळगाव शहरातील एल.के. फाउंडेशनची दहीहंडी ही शहराचे खास आकर्षण होते. यामध्ये पारंपरिक वाद्यांसह डीजेच्या तालासह आकर्षक विद्युत रोषणाई संपूर्ण परिसर हा भगवेमय करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दहीहंडीला तिरंग्याची सजावट करण्यात आली होती. यावेळी क्रेनच्या माध्यमातून २० फुट अंतरावर दहीहंडी लावण्यात आली होती. जुने जळगावातील तरूण कुढापा मित्र मंडळाच्या गोविंदानी ही दहीहंडी फोडून जल्लोष केला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील आणि  ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याहस्ते विजेत्या गोविंदा पथकाला पारितोषिक देण्यात आले.

दहीहंडी कार्यक्रमाला पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,  ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, विशेष सरकारी वकील उज्वल निकम, महापौर जयश्री महाजन,  आमदार सुरेश भोळे, एल.के. फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा मनपा सभागृह नेते ललित कोल्हे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


Protected Content