छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अवघ्या १२ रुपये किमतीचे पान फुकट न दिल्याने दोघांनी एका पानटपरी चालकाची त्याच्या पत्नी व मुलीसमोर चाकूने वार करत हत्या केली. हा प्रकार ११ जून मंगळवार रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास रांजणगाव परिसरात घडला. सुनील श्रीराम राठोड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवाजी प्रकाश दुधमोगरे, पवन प्रकाश दुधमोगरे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
सुनील राठोड यांची कमळापूर फाटा येथे मच्छी मार्केटजवळ पानटपरी आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या पानटपरीवर शिवाजी व पवन दुधमोगरे हे दोघे भाऊ आले. त्यांनी राठोड यांच्याकडून पान घेतले. त्यानंतर राठोड यांनी दुधमोगरे यांना पैशांची मागणी केली असता वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर टपरीतील सामानाची नासधूस करून ते निघून गेले. त्यानंतर राठोड यांनी पत्नी योगिता हिला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. पत्नी योगिता व मुलगी प्रिया या टपरीवर येऊन विचारपूस करीत होत्या, त्या वेळी पुन्हा दोन्ही आरोपी भाऊ तेथे आले व त्यांनी खून केला.
या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कृष्णा शिंदे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा पोलिसांनी आरोपी दोघा भावांना ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात योगिता यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निरीक्षक जयंत राजूरकर करीत आहेत. माझे पती अपंग असून त्यास का त्रास देता, असे पत्नी योगिताने आरोपींना विचारले असता, त्यांच्या हातावार लाकडी दांड्याने मारून बाजूला ढकलले. त्यानंतर त्यांनी सुनील राठोड यांना टपरीतून खाली ओढले. शिवाजी याने राठोड यांच्या गळ्याला व पोटावर चाकूने वार केल्याने ते गंभीर जखमी होऊन खाली पडले. त्यानंतर योगिता यांनी भाऊ राजू आडे यांना फोन करून बोलावून घेतले व रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राठोड यांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केले.