पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील तामसवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तत्कालीन शाखा व्यवस्थापकाने संस्था व खातेदारांची फसवणूक करून जवळपास 23 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आज पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे तिच्या विश्वासाहर्ता वर परिणाम होणार आहे. संशयित योगेश प्रकाश पाटील रा. आदर्श नगर पारोळा हा तालुक्यातील तामसवाडी येथील जेडीसीसी शाखेत 2016 मध्ये तत्कालीन शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्याने आपल्या कार्यकाळात शाखे अंतर्गत कापूस अनुदान, संजय गांधी निराधार, बोंड आळी अनुदान, रीबिट रक्कम आदि व खातरदारांच्या खाते मध्ये बोगस रकमा नावे टाकून त्या रकमा स्वतःच्या सेंट्रल बँक खात्यात एनइएफटीने वर्ग केलेल्या आहेत. तसेच स्वतःचे पारोळा जेडीसीसी शाखेतील खाते मॉडीफाय करून शालिक चौधरी नावाने ते बोगस खाते तयार करून त्या खात्यांमध्ये देखील काही रक्कम वर्ग केलेल्या आहेत. सन 2016 ते सप्टेंबर 2018 या कार्यकाळात योगेश पाटील याने हा अपहार केला असल्याचे 2019-20 या आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण करतांना लेखापरीक्षक अंकित अग्रवाल यांच्या निदर्शनास आले आहे.
परिणामी अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन शाखा व्यवस्थापक योगेश पाटील याविरुद्ध 22 लाख 73 हजार 734 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी व प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.