कोल्हापूर (वृत्तसंस्था) ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. नरेंद्र मोदी व अमित शहा हे देशाच्या हितादृष्टीने घातक असल्याचे सांगत त्यांना हटविण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी घेतला आहे. लोकसभेला ते आघाडीसोबत नाहीत, विधानसभेला त्यांच्याशी चर्चा होऊ शकते, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
यावेळी पवार पुढे म्हणाले की, आपण अनेक निवडणुका पाहिल्या, यापुर्वी देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रात एक-दोन वेळा प्रचारासाठी येत होते. आता नरेंद्र मोदी यांना दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात यावे लागतेय, यावरून येथील राजकीय हवा बदलत असल्याचे मागील निवडणूकीत दिलेली आश्वासने नरेंद्र मोदी सरकारने न पाळल्याने जनतेमध्ये असंतोष आहे. त्यामुळे रोज एक प्रचाराचे मुद्दे बाहेर काढत आहेत. व्यक्तीगत हल्ले करून त्यातून प्रतिसाद मिळत नसल्याने आता त्यांनी काश्मीरमध्ये काँग्रेस फुटीरवाद्यांसमवेत गेल्याची टीका करत आहेत. उलट भाजपाच त्यांच्यासमवेत सरकारमध्ये होते. तीन-चार वर्षापुर्वी मोदी यांनी काश्मीरच्या विकासाचा चांगला कार्यक्रम मांडल्याने त्याचे स्वागत केले होते.